शेतकरी उत्पादित मालाला योग्य भाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:32 PM2017-11-29T23:32:24+5:302017-11-29T23:32:50+5:30
यावर्षी अपुऱ्या पावसाने शेती संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत शेती उत्पादक मालाला योग्य भाव मिळत नाही.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : यावर्षी अपुऱ्या पावसाने शेती संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत शेती उत्पादक मालाला योग्य भाव मिळत नाही. एकीकडे सोयाबीनचे तेल बाजारात ८० ते ९० रू किलोप्रमाणे विकल्या जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनला २५ ते ३० रुपये किलो भाव दिला जात आहे. सोयाबीनला पाच हजार रुपये कापसाला सात हजार रुपये व धानाला तीन हजार ५०० रूपये भाव देण्याच्या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
भाजपा विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत होती. आता भाजपा युतीचे शासन आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार, अशी अपेक्षा होती.
पण सरकारकडून शेतकºयांविषयी ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या स्वामिनाथन आयोगाची सरकारद्वारे साधी चर्चा करण्यात येत नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीने मोठ्या प्रमाणात कापसाचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरीत नुकसानीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, तसेच बीटीकॉटन बियाणे कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, सर्व शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे विजबिल माफ करावे, अशा विविध मागण्यांचा समावेश निवेदनात होता.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात आम आदमी पार्टी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रभारी योगेश आपटे, बल्लारपूर-मूल प्रभारी सुनिल भोयर, संदीप पिंपळकर, भिवराज सोनी, अशोक आनंदे आदी उपस्थित होते.