आत्मरक्षणाकरिता बंदूक परवाना द्या; चंद्रपूरच्या शाहिस्ता खान पठाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 02:11 PM2019-12-03T14:11:57+5:302019-12-03T14:14:01+5:30
भद्रावती येथील ह्यूमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशन या संघटनेच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण यांनी स्वत:च्या अब्रू व जीवितेच्या रक्षणाकरिता बंदूक बाळगण्याच्या परवानगीची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भद्रावती येथील ह्यूमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशन या संघटनेच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण यांनी दिनांक २ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देवून स्वत:च्या अब्रू व जीवितेच्या रक्षणाकरिता तसेच आपल्या चिमुकल्या मुलीच्या रक्षणाकरिता बंदूक बाळगण्याच्या परवानगीची मागणी केली आहे.
आज देशभरात विविध क्षेत्रात कार्यरत महिला, गृहिणी,विद्यार्थिनी, नवजात मुलींपासून ते वयोवृद्ध महिला ह्या सातत्याने बलात्काराला विशेषता सामूहिक ब्लात्काराला बळी पडत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. कधी कुठली महिला या नरपिसाटांच्या विकृत मानसिकतेची बळी पडेल याचा नेम नाही. नुकतीच आंध्रप्रदेश येथील पशु वैदकीय अधिकारी प्रियंका रेड्डी या अशाच लिंगपिसाटांच्या वासनेला बळी पडलेल्या आहेत. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळण्यात आले आहे. दरोरज देशात कुठे न कुठे अशा अघोरी कृत्याला महिला बळी पड़त असल्यामुळे आज महिलांच्या जिवितेला धोखा निर्माण झाला आहे. आपण ४ वर्षाच्या लहान मुलीसोबत एकटीच राहत असून सामाजिक कार्यकर्ती असल्यामुळे रात्री - अपरात्री घरी यावे किंवा बाहेर जावे लागते त्यामुळे पिस्तूल बाळगण्याची परवानगी देण्यात यावी व यासोबतच जिल्ह्यातील महिलांना आत्मरक्षणा करिता पिस्तूल ( बंदूक) देण्यात यावी ही निवेदनातून मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिष्टमंडळात राजलक्ष्मी फुटाने, वनमाला टिकले, सीमा प्रसाद, शहाना शेख उपस्थित होत्या.