प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्याची माहिती द्या, पाच हजार मिळवा!
By साईनाथ कुचनकार | Published: July 3, 2024 03:13 PM2024-07-03T15:13:08+5:302024-07-03T15:14:23+5:30
उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते ‘रडार’वर : महापालिका प्रशासनाचे निर्देश
चंद्रपूर : महानगरपालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आता प्लास्टिक उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते ‘रडार’वर आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त मंगेश खवले यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्याबाबत माहिती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे.
प्लास्टिक बंदीसाठी मनपामार्फत उपद्रव शोध पथक तयार करण्यात आले असून, पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले, सर्व व्यावसायिक, वितरक, हार फुले विक्रेते यांच्याकडील प्लास्टिकचे आवरण असलेले बुके व खर्रा विक्री केंद्रांवरील पन्नी यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, प्लास्टिक पिशव्यांची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून, दिलेली माहिती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे.
बाजारात कोणत्याही छोट्या, मोठ्या वस्तू खरेदी केल्या की, आपसूकच दुकानदार प्लास्टिकची पिशवी देतो किंवा ती आवर्जून मागितली जाते. परिणामी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून मनपामार्फत विकल्प थैला नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
बैठकीस सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, सचिन माकोडे, संतोष गर्गेलवार, डॉ. अमोल शेळके, उपद्रव शोध पथक कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षाही होणार
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड, दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.