कनार्टका एम्टा, डागा व बैद्यनाथ खाणी वेकोलिला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 09:56 PM2018-11-17T21:56:11+5:302018-11-17T21:56:22+5:30
भद्रावती तालुक्यातील बंद अवस्थेत असलेल्या कर्नाटक एम्टा, डागा व विंजासन येथील प्रस्तावित बैद्यनाथ कोळसा खदान या तीनही खासगी कोळसा खदानी सुरू करून वेकोलिला हस्तांतरित करून देण्यात याव्या, तसेच वेकोलित कार्यरत कामगारांना त्या ठिकाणी सामावून घेण्यात यावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती तालुक्यातील बंद अवस्थेत असलेल्या कर्नाटक एम्टा, डागा व विंजासन येथील प्रस्तावित बैद्यनाथ कोळसा खदान या तीनही खासगी कोळसा खदानी सुरू करून वेकोलिला हस्तांतरित करून देण्यात याव्या, तसेच वेकोलित कार्यरत कामगारांना त्या ठिकाणी सामावून घेण्यात यावे. यासाठी वेकोलितील पाचही कामगार संघटनांनी आंदोलन करणे गरजेचे असून या प्रक्रियेत मी तुमच्या पाठीशी असून शासनही तुम्हाला मदत करेल, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलितील पाचही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
स्थानिक विश्रामगृहात वेकोलितील कामगारांच्या प्रश्नांबाबत बैठकीचे आयोजन केले होते. जुना कुनाडा कोळसा खाणीतील ठेकेदार संबंधित मशीन घेवून निघून गेला. परंतु वेकोलि व्यवस्थापनाद्वारे याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच एकोणा कोळसा खदानीत ठेकेदाराद्वारे काम सुरू असून तेथील ठेकेदार अपेक्षेप्रमाणे काम करीत नाही. वेकोलि व्यवस्थापन तेथील ठेकेदाराला पाठीशी घालत आहे. वेकोलि व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर यामुळे संशय निर्माण होत आहे. त्यामुळे माजरी क्षेत्र वेकोलिच्या कार्यप्रणालीबाबत सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, असे ना. अहीर म्हणाले.
ज्या क्षेत्रातील कामगार त्याच क्षेत्रात राहिला पाहिजे, स्वेच्छेने कोणी बाहेर जात असेल तर ठिक. त्याबाबत वेकोलिने सर्वप्रथम तशी नोटीस लावणे गरजेचे आहे.वेकोलि माजरी क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांना घेवून तेथील इंटक, बिएमएस, एचएमएस, आयटक, सिटु या पाचही कामगार संघटनाद्वारे ना. हंसराज अहीर यांना निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ना. हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात या समस्यांबाबत ८ सप्टेंबरला नागपूर वेकोलि मुख्यालयात वेकोलि सिएमडी सोबत बैठक झाली. त्यानंतर ४ नोव्हेंबरला पुन्हा सिएमडीसोबत बैठक झाली. वेकोलिची नकारात्मकता लक्षात घेवून या बैठकीचे आयोजन करून वेकोलि संघटनांनी वेकोलि विरोधात एलगार पुकारला आहे. या बैठकीला माजरी क्षेत्रातील इंटकचे सचिव धनंजय गुंडावार, कार्यकारी अध्यक्ष संजय दुबे, बिएमएस अध्यक्ष मोरेश्वर आवारी, अध्यक्ष कन्हैया रहांगडाले, वसंत सातभाई, आयटकचे अध्यक्ष धरमपाल, सचिव अनिल वरूटकर, एचएमएसचे सचिव दत्ता कोंबे, रहांगडाले आदी उपस्थित होते.
आतापर्यंत ९०० कामगारांचे स्थानांतरण
माजरी क्षेत्रातील चार कोळसा खदानी बंद झाल्या आहेत. ओवीचा बेंच कोसळल्याने जुना कुनाडा, कोळसा संपल्याने नवीन कुनाडा, चालु स्थितीत असलेली तेलवासा खदान व आयुध निर्माणीची पाईप लाईन असल्याने ढोरवासा खदान वेकोलिने बंद केल्या आहे. तेलवासा, जुना कुनाडा, ढोरवासा खदानीत आजही कोळसा असल्याने त्या खदानी त्वरित सुरू करण्यात याव्या व एकोणा खदान ठेकेदारांच्या ऐवजी वेकोलि व्यवस्थपनाद्वारे चालविण्यात यावी, अशी कामगार संघटनांची मागणी आहे. बंद झालेल्या कोळसा खदानीतील अतिरिक्त ठरलेले कामगार क्षेत्राच्या बाहेर पाठविण्यात येत आहे. याबाबत कामगार संघटनांचा विरोध आहे. २०१२ पासून आतापर्यंत जवळपास ९०० कामगारांचे स्थानांतरण झाले आहे.