जनतेला ईश्वराचा अंश समजून सेवा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:26 AM2018-05-03T01:26:12+5:302018-05-03T01:26:12+5:30
राज्याच्या प्रगतीत चंद्रपूरचे दायित्व वाढविण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस असून आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील प्रगती महाराष्ट्राच्या विकासात उमटली पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रमासोबतच संकल्पबद्ध होणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याच्या प्रगतीत चंद्रपूरचे दायित्व वाढविण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस असून आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील प्रगती महाराष्ट्राच्या विकासात उमटली पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रमासोबतच संकल्पबद्ध होणे गरजेचे आहे. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी सुकर्मी असला पाहिजे. जनतेला ईश्वराचा अंश समजून सेवा देणारा असला पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र दिनाला पोलीस कवायत मैदानावर सकाळी ध्वजारोहण केल्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका शानदार सोहळयात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पोलीस व अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा तसेच विविध क्षेत्रात जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या मान्यवरांचा, गुणवंतांचा त्यांनी सत्कार केला. आजच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुख्य संबोधनानंतर झालेल्या पुरस्कार सोहळयाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मनपा आयुक्त संजय काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ज्यांच्या श्रमाच्या बळावर महाराष्ट्र घडतो आहे, समोर जातो आहे, देशात व जगात आपली छाप सोडतो आहे. त्या श्रमिकांना सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. कामगारांमुळेच आज महाराष्ट्राचे देशात व जगात अद्वितीय स्थान आहे. महाराष्ट्राचे वर्णन चांदा ते बांदा असे केले जाते. एका समृध्द राष्ट्रनिमार्णामध्ये महाराष्ट्राने कायम आपले दायित्व पूर्ण केले असून देशाच्या एकूण प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा सहभाग महत्त्वाचा आहे. देशाच्या जीडीपीमध्ये अन्य ३१ राज्याच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राने १५ टक्के सहभाग नोंदवला आहे. जगात उद्योग क्षेत्रात देश नवव्या क्रमांकावरुन सहाव्या क्रमांकावर झेप घेत आहे.
या क्षेत्रात राज्यातील कामगारांच्या बळावर महाराष्ट्राचा सहभाग २० टक्कयांचा आहे. थोडक्यात देशातील प्रत्येक पाच कामगारात एक कुशल कामगार महाराष्ट्राचा आहे. सर्वाधिक महसूल देण्याचे कामही राज्याने केले आहे. राज्याच्या कामगारांनी, श्रमिकांनी मेहनत करुन राज्याच्या महसूलातही अपेक्षेपेक्षा अधिक महसूल गोळा करण्याची किमया केली आहे.
यामुळे देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा महत्वाचा असून तसाच वाटा चंद्रपूरचा महाराष्ट्राच्या विकासात असला पाहिजे. आज महाराष्ट्र दिनाला संकल्प करु या की राज्याच्या वाट्यात वाघांचा प्रदेश असणाºया चंद्रपूरचा वाटा वाघा प्रमाणेच सर्वाधिक राहील.
जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील १० आदिवासी मुले एव्हरेस्ट सर करायला निघाली आहेत. या घटनेचा उल्लेख त्यांनी जिल्ह्यासाठी अभिमानाचा असल्याचा केला. ते म्हणाले, आपण प्रयत्न केला आणि आदिवासी आश्रमशाळेतील सात मुले व तीन मुली वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज झाले. गेल्यावर्षी आपण संकल्प केला आणि आता देशात प्रथमच एका जिल्ह्याचा झेंडा एव्हरेस्टवर फडकण्याचा विक्रम होणार आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व आदिवासी विकास विभागाचे कौतुक केले.
सुकर्मी कर्मचाऱ्यांचा सत्कार
यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख रऊफ शेख इब्राहिम, पोलीस हवालदार बाळकृष्ण पुलगमवार, विजय हेमणे, शंकर राऊत, संतोष गुप्ता, भास्कर कुंदावार, प्रभाकर चिकनकर, प्रदीप खरकाटे, विजय झोडे, तिर्थराज चौधरी, राजकुमार उरकुडे यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. तसेच ६७ व्या महाराष्ट्र राज्य हिंदी अंतिम नाटय स्पर्धेत ‘रंगबावरी’ या नाटकाने निर्मितीचा प्रथम पुरस्कार प्राप्त केला. त्या अनुषंगाने डॉ. जयश्री कापसे-गांवडे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, बकुळ धवने ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, पंकज नवघरे व तेजराज चिकटवार यांना नेपथ्यकार तर श्रीपाद जोशी यांना नाट्यलेखनाबद्दल सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कोरपना येथील तलाठी एम. एस. अन्सारी यांचा गौरव केला. उत्कृष्ट संचालनसाठी अशोक उपाख्य मोटोंसिंह ठाकूर, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल डॉ. राकेश तिवारी यांचा सन्मान करण्यात आला.
वाघासारखे काम करा
जगातल्या सर्वाधिक वाघाची संख्या असणाऱ्या जिल्ह्याचे आम्ही प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे पराक्रमी वाघासारखे काम प्रत्येकाला करायचे आहे, असे मत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. आपल्या जिल्ह्याला सेवेचे व्रत आहे. आनंदवनातून आम्हाला यासाठी बळ मिळते. चिमूरच्या स्वातंत्र्य लढयातून देशभक्तीची उर्जा मिळते. तर चंद्रपूरच्या दीक्षा भूमीतून सोशितांचा आवाज बुलंद करण्याची प्रेरणा मिळते, असेही ते यावेळी म्हणाले.