शेतमालाला भाव द्या, नाहीतर मरण...
By admin | Published: November 12, 2016 12:51 AM2016-11-12T00:51:17+5:302016-11-12T00:51:17+5:30
खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच निसर्गाने दगा दिला. हाती पैसा शिल्लक नसताना उसनवारी व कर्ज काढुन कसेतरी शेती पिकविली.
शेतकरी काकुळतीला : हाक शासन दरबारी पोहोचणार काय ?
प्रकाश काळे गोवरी
खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच निसर्गाने दगा दिला. हाती पैसा शिल्लक नसताना उसनवारी व कर्ज काढुन कसेतरी शेती पिकविली. मात्र उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. उत्पादनापेक्षा खर्च वाढला. त्या तुलनेत शेतमालाला योग्य दर मिळणे अपेक्षीत होते. मात्र तसे न करता कापूस आणि सोयाबिनची कवडीमोल भावात खरेदी सुरू झाली आहे. हा तोकडा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव द्या, नाहीतर मरण... अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांत उमटत असून काकुळतीला आलेल्या शेतकऱ्यांची हाक शासनदरबारी पोहोचेल काय, हा प्रश्न आहे.
शेतीला आज वाईट दिवस आले असून शेतकऱ्यांना कुणाचीही साथ उरली नाही. शेतीवर होणारा खर्च बघता शेतमालाला योग्य दर देणे अपेक्षीत आहे. मात्र तोकडा दर शेतकऱ्यांच्या माथी मारून कवडीमोल भावात कापूस व सोयाबीनची खरेदी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळाले पाहिजे, तरच शेतकरी सुखी होईल. शेतकऱ्यांचा हा संघर्ष गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. परंतु, शेतकऱ्यांना त्यांचा हक्कच अजुनपर्यंत मिळालेला नाही. हा शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक केला गेलेला अन्याय आहे.
शेतमालाला भाव नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी दिवाळीही साजरी केली नाही. दिव्यांच्या लखलखाटात सारा आसमंत उजळून निघाला असताना शेतकऱ्यांच्या घरी अंधार पसरला होता. गरजेपोटी शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस काढला आहे. परंतु, हा तोकडा दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे. शासनाने अजुनही कापसाचा दर घोषीत केला नाही. कवडीमोल भावात कापूस सोयाबिनची अक्षरश: लूट केली जात आहे. परंतु, शेतकऱ्यांचा नाईलाज झाला असून याचा पुरेपूर फायदा खासगी व्यापारी घेत आहे.
कापसाची ५ रुपये किलोप्रमाणे वेचणी सुरू आहे. दोन हजार रुपये बॅग प्रमाणे शेतकऱ्यांनी सोयाबिनची कापणी केली. परंतु, १ हजार ८०० पासून दोन हजार ७०० पर्यंत सोयाबिन खरेदी करणे सुरू आहे. त्यामुळे निराश होऊन शेतकरी वर्ग आयुष्यच संपवायला निघाला आहे. परंतु, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांचा माल विकल्यावर जर दरवाढ करण्यात येत असेल तर तो जाणीवपूर्वक केला गेलेला अन्याय आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. शेतमालाला भाव द्या, नाहीतर मरण... ही शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या मोदी सरकारचे वाभाडे काढणारी आहे. त्यामुळे सरकारने शेतमालाला योग्य भाव देणे अपेक्षीत आहे.
शेतकऱ्यांचे राजकीय पुढारी गेले कुठे?
शेतकरी आज पूर्णत: देशोधडीला लागला आहे. शेतमालाला योग्य भाव नाही तरीही शेतकऱ्यांना गरजेपोटी कवडीमोल भावात आपला माल विकावा लागत आहे. निवडणूक काळात ‘हम तुम्हारे साथ है’ म्हणत शेतकऱ्यांच्या काळजातून बोलणारे राजकीय नेते आज गेले कुठे? शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणताही राजकीय नेता नाही, ही शोकांतिका आहे.
शेतकऱ्यांना हवे घामाचे दाम
दिवस-रात्र ऊन-वारा, पाऊस थंडीची तमा न बाळगता शेतकरी वर्ग शेतात राबतो. मात्र त्याने पिकविलेल्या हक्काच्या चतकोर भाकरीलाही तो पोरका झाला आहे. शेतकऱ्यांना आता हक्काचे घामाचे दाम मिळाले पाहिजे, यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे.