गोसीखूर्दच्या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:28 AM2018-07-06T00:28:18+5:302018-07-06T00:29:44+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखूर्दच्या कालव्यात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखूर्दच्या कालव्यात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, उपविभागीय अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या गोसीखूर्द प्रकल्पाच्या कालव्यांचे काम मोठया प्रमाणात सुरु आहेत. त्या कालव्यांकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करताना वेगवेगळया गावांना वेगवेगळे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात नाराजीचा सूर दिसून येत आहे. या कालव्यांसाठी जमिनी देण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे आज त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. तेव्हा प्रत्येक गावातील खरेदी, विक्रीचे दर वेगवेगळे असून त्या खरेदी विक्रीच्या आधारावर दर निश्चित केलेले आहेत. त्यामुळे अशी तफावत दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना जमिनीचे एकच दर देण्यात येवून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली. तेव्हा या दोन्ही मागण्यांचा विचार करुन त्यावर निर्णय घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना न देता शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्यामुळे ज्या बँका शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत, अशा बँकावर कडक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. ज्यांनी आॅफलाईनव्दारे कर्जमाफीचे अर्ज केलेले आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.