संगमेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:28 AM2021-09-03T04:28:51+5:302021-09-03T04:28:51+5:30
कोरपना : चंद्रपूर- यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील, पैनगंगा व विदर्भ नदीच्या संगम स्थळावर असलेल्या संगमेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी ...
कोरपना : चंद्रपूर- यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील, पैनगंगा व विदर्भ नदीच्या संगम स्थळावर असलेल्या संगमेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. या संगम स्थळावरील मंदिर प्राचीन असून धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना त्रास
कोरपना : तालुक्यातील वनसडी ते कवठाळा फाटा मार्गाचे काम सुरू आहे. मात्र सदर काम अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील चिखलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक करतात. त्यामुळे रहदारीस अडचण जाते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.
रेल्वे मार्गाची नागरिकांची मागणी
मूल : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास गडचिरोली व चंद्रपूर जोडले जाईल. पर्यायाने येथील बाजारपेठेला चालना मिळेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
कोरपना - कातलाबोडी रस्त्याची दुरवस्था
कोरपना : तालुक्यातील कोरपना ते कातलाबोडी रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनधारक व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग कातलाबोडीसह बोरगाव, हातलोणी, तीर्थक्षेत्र घाटराई आदी गावांना पुढे जोडला गेला आहे. तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, उपकोषागार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शासकीय गोदाम, शासकीय आदिवासी मुलाचे वसतिगृह, वसंतराव नाईक महाविद्यालय येथे जाण्यासाठी याच प्रमुख मार्गाने जावे लागते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेलचेल असते; परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्याने सद्यस्थितीत प्रवास करणे जिकिरीचे ठरते आहे. १९९८ ला या रस्त्याची निर्मिती करण्यात आली. आजवर रस्ता सुस्थितीत असल्याने तेव्हापासून या रस्त्यावर साधी डागडुजी करण्यात आली नाही; परंतु गेल्या एक वर्षापासून या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीकडे मात्र बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
उद्योगांची निर्मिती करावी
सिंदेवाही : तालुक्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता बेरोजगारांमध्ये नैराश्य आले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्यामुळे युवकांमध्ये निराशा पसरत आहे. तालुक्यात रोजगाराची कोणतीही साधने नाहीत. उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे शेतीवर आधारित लघुउद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी आहे.
कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ
राजुरा : वाहनांवर कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी आहे, असे असतानाही काही तरुण मोठ्या प्रमाणात दुचाकीवर हॉर्न लावून वाजवितात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी आहे.
मोफत संगणक प्रशिक्षण द्यावे
चंद्रपूर : सगळीकडे संगणकीय कामाला सुरुवात झाली आहे. संगणक साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. शासनातर्फे मोफत संगणक प्रशिक्षण देण्याची मागणी आहे.