संगमेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:47+5:302021-09-07T04:33:47+5:30
पदव्युत्तर महाविद्यालयाचा अभाव चंद्रपूर : जिल्ह्यात शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वरोरा शहरात एकही पदव्युत्तर महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना भद्रावती ...
पदव्युत्तर महाविद्यालयाचा अभाव
चंद्रपूर : जिल्ह्यात शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वरोरा शहरात एकही पदव्युत्तर महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना भद्रावती किंवा चंद्रपूर येथे जाऊन आपले पुढील शिक्षण पूर्ण करावे लागते.
बसस्थानक नसल्याने गैरसोय
चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती, कोरपना, पोंभूर्णा, गडचांदूर, भिसी, माजरी, नवरगाव, दुर्गापूर, विसापूर, कोठारी या महत्त्वपूर्ण ठिकाणी सुसज्ज बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रेल्वेमार्गाची नागरिकांची मागणी
मूल : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वेमार्ग तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल. पर्यायाने येथील बाजारपेठेला चालना मिळेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागात जनजागृती करावी
चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये शासनाने वैयक्तिक शौचालय बांधून दिले आहे. असे असतानाही आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही नागरिक शौचालयाचा वापर न करताच बाहेर जात आहे. त्यामुळे जनजागृती करणे गरजेचे आहे.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
चंद्रपूर : ऑनलाइन वेतन देयक तयार करण्यासाठी इंटरनेटसह संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक, तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
जिल्ह्यात वाढीव टाकीचा अभाव
वरोरा : शहराचा विस्तार वाढत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी एका पाणी टाकीचे बांधकाम करण्याची गरज आहे. नगरपंचायतीने याबाबत हालचाली कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वरोरा शहरातील काही वॉर्डांना अतिशय कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय अनेक नागरिक नळाला टिल्लूपंप लावत असल्याने काही भागांतील लोकांना अपुरे पाणी मिळत आहे.
बंद पथदिव्यांमुळे गैरसोय
चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ, कृष्णनगर, पठाणपुरा वॉर्डातील काही पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
नळयोजनांना तांत्रिक अडचणींचे ग्रहण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नाही.
पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने, जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला, परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे.