झोपडपट्टीधारकांना हक्काचे पट्टे द्या
By admin | Published: October 24, 2015 12:35 AM2015-10-24T00:35:55+5:302015-10-24T00:35:55+5:30
चिमूर येथील इंदिरानगर व केसलापूर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, ..
चिमूर तापले : निवडणुकीत मुद्दा गाजणार
चिमूर : चिमूर येथील इंदिरानगर व केसलापूर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, या मागणीकरिता बराच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान जून २००६ मध्ये या संदर्भात प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र अजूनपर्यंत चिमूर येथील इंदिरानगर झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे दस्ताऐवज प्राप्त झाले नसल्यामुळे नागरिकांत शासन व प्रशासनाच्या विरोधात असंतोष पसरला आहे.
चिमूर येथील इंदिरा नगर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, या मागणीकरिता कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक सुरेश डांगे मार्फत २००२ पासून संघर्ष सुरू आहे. इंदिरा नगरात मागील ४० वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर, रिक्षा चालक, घरेलू कामगार, झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहेत. या वस्तीच्या घरांना भोगवटा कर लावण्यात आला आहे. हा कर नियमित भरणाऱ्या झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नाही. शेवटी कष्टकरी जन आंदोलनाने पुढाकार घेऊन ३१ मार्च २००३ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदनाच्या प्रति सर्व लोकप्रतिनिधीला देण्यात आल्या. त्यानुसार तत्कालीन आमदार तथा विद्यमान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० एप्रिल २०१३ रोजी तहसीलदारांना पत्र पाठविले. या पत्राची दखल न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांनी स्मरणपत्र दिले. त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना चौकशी अहवाल पाठवा, अशी सूचना केली होती. याही सूचनेचे पालन करण्यात आले नाही.
आठ दिवसानंतर प्रशासनातर्फे कुठलीही हालचाल न झाल्याने २४ आॅगस्ट व १० सप्टेंबर २०१४ रोजी धरणे आंदोेलन करुन हजारोंच्या संख्येत शक्तिप्रदर्शन केल्याने प्रशासनात थोड्या हालचाली सुरू झाल्या होत्या. १० जून २००५ रोजी तलाठ्याने सकारात्मक अहवालसुद्धा तहसीलदारांना दिला होता. या अहवालानंतरसुध्दा पट्टे देण्यात आले नाही. तेव्हा २४ आॅक्टोबर २००५ रोजी तत्कालिन तहसीलदार अरुण झलके यांना शिष्टमंडळाच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले होते. तेव्हा झलके यांनी या परिसरात झोपडपट्टी धारकांना दंड आकारला. तो दंड झोपडपट्टीधारकांनी जमा केला. मात्र आज तारखेपर्यंत या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नाहीत. एखाद्या मागणीसंदर्भात आंदोलन केल्यानंतर हालचाली करणे हे प्रशासनाचा धर्म झालेला दिसतो. या मागणीकरिता आंदोलन करुन झोपडपट्टीधारक आता थकले असावेत, असा भ्रमात शासन व प्रशासनाने राहू नये. येत्या काही दिवसातच आंदोलनाच्या तयारीत येथील जनता आहे. (तालुका प्रतिनिधी)