मोबाइलला अधिक महत्व देणे, घटस्फोटाचे ठरत आहे कारण
By साईनाथ कुचनकार | Published: October 2, 2023 03:56 PM2023-10-02T15:56:45+5:302023-10-02T15:57:28+5:30
भारतीय परिवार बचाव संघटना : पोलीस प्रशासनाला दिले निवेदन
चंद्रपूर : सध्याच्या काळात मोबाइल हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग झाला आहे. मात्र कौटुंबिक सुख-समाधानापेक्षा मोबाइलला महत्व देणे मागील काही वर्षांमध्ये घटस्फोटाचे कारण ठरत आहे. या सर्व प्रकारात मोबाइल व माहेर कारणीभूत ठरत आहे. या समस्येला आळा बसावा, यासाठी अधिकाधिक जनजागृती करावी सोबतच कुटुंब तोडण्यापेक्षा तडजोड घडवून आणावी, यासाठी येथील भारतीय परिवार बचाव संघटनेने वरोरा येथील पोलिस निरीक्षक अमोल कासारे यांना निवेदन दिले.
यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, वसंत भलमे, मोहन जीवतोडे, प्रदीप गोविंदवार, सुदर्शन नैताम, सचिन बरबटकर, प्रशांत मडावी, नितीन चांदेकर, गंगाधर गुरूनुले, स्वप्नील सूत्रपवार आदी उपस्थित होते. निवेदनामध्ये मागील काही वर्षांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहेत. घटस्फोटाची आकडेवारी कुटुंब व्यवस्थेला हादरवून टाकणारी असल्याचे नमूद करण्यात आले असून मोबाइल व माहेर खरे खलनायक ठरत असल्याचे म्हटले आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या एकूण दाव्यापैकी ४० टक्के वाज हे मोबाइल आणि माहेरच असल्याचेही यावेळी निवेदनात म्हटले आहे.
मोबाइल हा पती-पत्नीत संशय निर्माण करीत आहे. तर काही ठिकाणी माहेर पती व सासरला बोटावर नाचविण्याचा सल्ला देतात. आपल्या मुलीचा संसार चांगल्या प्रकारे चालावा, असे वाटत असेल तर लग्नानंतर माहेरच्यांनी विनाकारण मुलीच्या संसारात, कुटुंबात लुडबुड करणे टाळावे. पती-पत्नीला संसारात रुळू द्यावे त्याचे मन संसारात रमू द्यावे.
- डाॅ. नंदकिशोर मैंदळकर, जिल्हाध्यक्ष भारतीय परिवार बचाव संघटना
काय आहे कारण?
पती-पत्नीच्या नाजूक नात्यावर मोबाइल व माहेर भारी पडत आहे. मोबाइलवर सतत बोलणे, व्हाॅट्सॲपवर चॅटिंग करणे, मोबाइलवर बोलत असताना कौटुंबिक महत्त्व कमी करणे, वडीलधाऱ्यांचा मान न राखणे, यातून होणाऱ्या गैरसमजुतीतून विसंवाद आणि वाढणारा संशय हे पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाचे कारण ठरत आहे.