परीक्षेला धाडसाने सामोरे जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:22 PM2018-12-16T22:22:59+5:302018-12-16T22:24:04+5:30
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या मिशन सेवा अंतर्गत मार्गदर्शनाच्या सत्रामधील रविवारचे दुसरे पुष्प जिल्हा पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे यांनी गुंफले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या मिशन सेवा अंतर्गत मार्गदर्शनाच्या सत्रामधील रविवारचे दुसरे पुष्प जिल्हा पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे यांनी गुंफले. आगामी काळात येणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या परीक्षांना आयुष्याचा प्रश्न न करता त्यांना केवळ नियमित परीक्षेसारखे ट्रीट करावे. अभ्यासाची नियमित पद्धत अवलंबून अत्यंत व्यावसायिकपणे या परीक्षेला धाडसाने सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक बाबा आमटे अभ्यासिकेमध्ये आयोजित मार्गदर्शन सत्राच्या दुसºया रविवारी जिल्हाभरातील उपस्थित स्पर्धा परीक्षेत इच्छूक मुलांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. येणाºया परीक्षा या नियमित येणाºया परीक्षा आहेत. यामध्ये फक्त संख्या जास्त असणार आहेत. त्यामुळे परीक्षा देण्याआधीच काही मुलांनी जर या परीक्षांमध्ये आपल्याला यश नाही मिळाले तर काय करायचे, अशा भावनिक प्रश्नांना अधिक महत्व न देता नियमित होणाºया परीक्षेसारखी परीक्षा असून यामध्ये भरपूर जागा आहे. त्यामुळे या संधीचा फक्त उत्तम फायदा घ्या, ही व्यावसायिक परीक्षा देताना आपल्या मनाची तयारी असली पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर कमी वेळेमध्ये किती जास्त पण अचुक उत्तरे देऊ शकतो. याला महत्व असते. ज्यावेळी आपण पेपर सोडवयाला सुरूवात करतो. त्यावेळेस त्यात परीक्षेपूर्वी तयार केलेल्या तयारीतून निर्माण झालेल्या ज्ञानाची उर्जा आपल्यालाही प्रश्न सोडवायला मदत करते.
त्यामुळे ऐनवेळी कुठल्याही गोष्टीचा ताण घेणे योग्य नव्हे. परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वीच मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा विचारांमध्ये आपला वेळ वाया घालू नका. त्यापेक्षा एक एक शिखर गाठण्यासाठी आवश्यक असणारी जी तयारी आहे ती तयारी टप्प्याटप्पयाने करणे यश संपादन करण्यासाठी महत्वाचे असते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या सत्राचे आयोजन पुढेही प्रत्येक रविवारी करण्यात येईल. २० डिसेंबरपर्यंत या संदर्भात नोंदणी करणे आवश्यक आहे. आज अमोल मांडवे यांनी बाबा आमटे अभ्यासिकेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांशी शेवटच्या सत्रात संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूकदेखील केली. याशिवाय त्यांना येणाऱ्या परीक्षांबाबत असणाºया शंका, प्रश्न आदींचे निराकरणही केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सीएम फेलो पराग जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन स्रेहा मेघावत यांनी केले.
पहिली परीक्षा २३ डिसेंबरला
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या मिशन सेवांतर्गत राज्य शासनामार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच आवश्यक अभ्यास साहित्याचे वाटपही या योजनामध्ये केले जाणार आहे. तथापि या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या युवकांना एमपीएससी पूर्व परीक्षेचे सराव परीक्षेसाठी आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. हॅलो चांदा या मोबाईलअॅप वर देखील याबाबत लिंक देण्यात आली आहे. या सराव परीक्षा सत्रातील पहिली ही २३ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्यात येईल. सदर परीक्षेचे प्रश्न संच हे पुणे येथील नामवंत संस्थेमार्फत तयार करण्यात आले असून हे सत्र विद्यार्थ्याकरिता पूर्णपणे विनामूल्य राहील.