कर्ज काढून उभे केलेले गोटफार्म पावसात उद्ध्वस्त; युवकाचे स्वप्न पुरात वाहून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 03:27 PM2022-07-27T15:27:37+5:302022-07-27T15:38:42+5:30
वर्धा नदी फुगल्याने पूर आला व संपूर्ण गोटफार्म, शेती पाण्याखाली आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आशिष खाडे
पळसगाव (चंद्रपूर) : मागील काही दिवसांमध्ये शेतीला लागवड खर्च अधिक आणि उत्पादन कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच निसर्गसुद्धा साथ देत नसल्याची स्थिती आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील मनोज वसंत देरकर (२७) यांनी भाडेतत्त्वावर शेती घेऊन जंगलालगत गोटफॉर्म सुरू केले. पण, आलेल्या पुरामुळे त्याचे मोठे नुकसान झाले असून, बघितलेले स्वप्न पुरात वाहून गेले.
बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील मनोज देरकर यांनी नोकरीच्या मागे न धावता कर्ज घेऊन स्वतःचा गोटफार्म सुरू केला. यासाठी त्याने शेतीसुद्धा भाडेतत्त्वावर घेतली. व्यवसायाला सुरुवात करून अगदी चार महिने झाले. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर शेतामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला लावला. यासोबतच गोटफार्ममध्ये कुक्कुटपालनदेखील सुरू केले होते. मात्र, ७ जुलैला वरुणराजा कोपल्याने ढगफुटीसारखी स्थिती होती. वर्धा नदी फुगल्याने पूर आला व संपूर्ण गोटफार्म, शेती पाण्याखाली आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता शेतीचे भाडे, सोबतच झालेला खर्च काढायचा कुठून, हा प्रश्न त्याला पडला आहे. त्यामुळे शासनाने मदत करण्याची मागणी केली जात आहे.
शेती परवडत नसल्याने जोडधंदा म्हणून कर्ज काढून गोटफार्म सुरु केले. शेती भाड्याने घेतली. यामध्ये भाजीपाला, कुक्कुटपालन सुरू केले. मात्र आलेल्या पुरामुळे सर्वकाही गेले. त्यामुळे शासनाने मदत केल्यास पुन्हा व्यवसाय उभा करणे शक्य होईल.
- मनोज देरकर, शेतकरी, पळसगाव