देवी महाकाली यात्रेसाठी प्रशासन सज्ज
By admin | Published: March 31, 2017 12:39 AM2017-03-31T00:39:38+5:302017-03-31T00:39:38+5:30
संपूर्ण जिल्ह्यात ओळख व अस्मिता असणाऱ्या देवी महाकालीच्या नवरात्र उत्सवास २ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.
चंद्रपूर शहर वाहतूक मार्गात बदल : अवैध वाहतूक टाळण्याचे आवाहन
चंद्रपूर : संपूर्ण जिल्ह्यात ओळख व अस्मिता असणाऱ्या देवी महाकालीच्या नवरात्र उत्सवास २ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सुमारे महिनाभर चालणाऱ्या या उत्सवादरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या काळामध्ये करण्यात आलेल्या वाहतूक बदलाचे पालन व्हावे व यात्रेत येणाऱ्या भाविकांनी अधिकृत प्रवासी वाहनानेच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने या परिसरातील साफसफाई मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु केली असून अनेक कार्य अंतिम टप्प्यात आहे. या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी चंद्रपूरचे नागरिक अन्य प्रदेशातून येणाऱ्या भाविकांचे मोठ्या आदरतित्यांने स्वागत करतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात स्वंयसेवी संस्था या संदर्भात कार्यरत झाल्या आहेत.
महीनाभर चालणाऱ्या यात्रेत महाकालीच्या दर्शनासाठी येणारे स्थानिक तसेच इतर जिल्ह्यातील भाविक हे बहुतांशी वेगवेगळया प्रवासी वाहनातून प्रवास करुन येत असतात. तसेच प्रवासी वाहनाच्या व्यतिरिक्त माल वाहतूक करणाऱ्या वाहनामधून देखील मोठ्या प्रमाणावर भाविक प्रवास करुन येत असतात. देवी महाकालीच्या दर्शनासाठी येताना बहुतेक भाविक वाहन प्रवासी आसन क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी बसवून धोकादायक परिस्थितीत प्रवास करतात. अशावेळी एखादा दुदैवी अपघात घडतात. हे अपघात टाळावे, असे आवाहन एसपींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वाहतुकीत बदल
महाकाली यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्या-येण्यास किंवा घरी परतण्यास भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड मार्गाचा वापर करावा. निर्धारीत कालावधीमध्ये अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरिता बंद करण्यात आल्याने इतर वाहनधारकांनी बायपास रस्त्याचा उपयोग करावा. चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव मार्गे जटपूरा गेटकडे येणारी दुचाकी, चारचाकी व इतर वाहने ही जटपूरा गेट बाहेर विरुध्द दिशेने न जाता सरळ मौलाना आझाद चौकातून, आझाद बगीचाच्या बाजूचे रिंग रोडने जयंत टॉकीज चौकातून वळण घेऊन महात्मा गांधी मार्गाने जटपूरा गेट मधून बाहेर जातील.