गोंदेडा तपोभूमीत लोटला गुरुदेवभक्तांचा सागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:14 PM2019-01-21T23:14:11+5:302019-01-21T23:14:55+5:30
चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंताची तपोभूमी म्हणून ओळखले जाणाऱ्या गोंदेडा येथे तीन दिवशीय यात्रा महोत्सवाचा सोमवारी समोरोप झाला. या निमित्त गोंदेडा तपोभुमीत गुरुदेवभक्तांचा सागर लोटला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंताची तपोभूमी म्हणून ओळखले जाणाऱ्या गोंदेडा येथे तीन दिवशीय यात्रा महोत्सवाचा सोमवारी समोरोप झाला. या निमित्त गोंदेडा तपोभुमीत गुरुदेवभक्तांचा सागर लोटला होता.
या मुख्य कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मोझरी संस्थानचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार मितेश भांगडिया, आमदार किर्तीकुमार भांगडिया, लक्ष्मण काळे महाराज, पाटील महाराज, नानाजी महाराज, भाजप नेते वसंत वरजूकर, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, जि.प. सदस्य गजानन बुटके, ममता डुकरे, पं. स. सभापती विद्या चौधरी, उपसभापती शांताराम सेलवाटकर, पं. स. सदस्य लता पिसे, नगरसेविका सीमा बुटके आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी लक्ष्मण काळे महाराज यांचे कीर्तनाने गुरुदेवभक्तांना मंत्रमुग्ध केले, तर मोजारीचे प्रकाश वाघ यांनी अध्यक्षीय भाषण केले. याप्रसंगी अनेकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विवेक कापसे, तर प्रास्तविक अध्यक्ष सावरकर यांनी केले. मुख्य यात्रेदरम्यान सकाळी रामधून काढून गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गटनेते डॉ. सतीश वारजूकर, सरपंच धारणे उपस्थित होते. तीन दिवसीय यात्रेत शेकडो युवकांनी रक्तदान केले. दरम्यान पुरुष, महिलांच्या भजन स्पर्धा,रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. शेकडो पालख्यांनी गुरुदेवाचे दर्शन घेतले.
राष्ट्रसंतांना भारतरत्नसाठी प्रयत्न करणार -अशोक नेते
खंजिरीतून समाज जागृती करीत देशाच्या स्वतंत्र लढ्यात उडी घेत हे आंदोलन चिमूर नगरीपासून सुरू करणाºया राष्ट्रसंताचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्याच आशीवार्दाने खासदार होता आले. त्यामुळे त्याच्या उपकाराची परतफेड करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून राष्ट्रसंतांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, या गुरुदेव भक्तांच्या मागणीसाठी संसदेत प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी यावेळी दिली. राष्ट्रसंताचे तैलचित्र संसदेत लावण्याची तयारी सुरू असून संसदेत ठराव घेण्यात आला आहे. आमदार भांगडिया यांनी ३२ कोटी रुपयांचा निधी आणून विकास केला आहे, असेही ते म्हणाले.
गोंदेडा गुरुकुंज मोझरीसारखी करणार-बंटी भांगडिया
देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या गोंदेडा तपोभूमीत यात्रा महोत्सवानिमित्त लाखो गुरुदेव भक्त उपस्थित राहतात. येथे ६० मीटरचा रस्ता मंजूर झाला आहे. गुरुकुंज मोझरीप्रमाणे गोंदेडा तपोभूमीचा विकास करायचा आहे, अशी ग्वाही आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी यावेळी दिली. गुरुदेवांच्या विचारावर आपण चालतो का, असा प्रश्न निर्माण करीत युवकांनी ग्रामगीतेतील गोष्टी स्वत: आत्मसात करून इतरांनाही प्रेरीत करण्याचा संदेशही आमदार भांगडिया यांनी यावेळी दिला.
गुरुदेवांची यात्रा महोत्सव सेवेसाठी -मितेश भांगडिया
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ५९ वर्षांपूर्वी सुरु केलेली ही यात्रा सेवेसाठी आहे. युवाशक्तीने सेवेचा भाव निर्माण करावा. येथील विकास होत असून पुन्हा पुन्हा विकास करून मोझरीप्रमाणे देशातून प्रसिद्ध व्हावे, अशी इच्छा आहे. गोंदेडा तपोभूमीला दुसरी मोझरी करण्यासाठी प्रयत्न करणार असून युवकांनी सेवा करावी, असे आवाहन माजी आमदार मितेश भांगडिया यांनी यावेळी केले.