मेहुलच्या फिरकीने गोंदिया जिल्हा संघांची विकेट
By परिमल डोहणे | Published: April 28, 2023 09:23 PM2023-04-28T21:23:46+5:302023-04-28T21:23:56+5:30
मेहुलनेच पटकावल्या दहाही विकेट : आंतरजिल्हा क्रिकेट टुर्नामेंट
चंद्रपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे चंद्रपुरातील युथ क्रिकेट अकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या आंतरजिल्हा क्रिकेट टुर्नामेंटमध्ये चंद्रपूर संघातील मेहुल शेगमवार (२५) या डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाने संपूर्ण दहाच्या दहा विकेट पटकावत गोंदिया संघाला केवळ ७६ रनावर ऑल आउट केले. त्याच्या या कामगिरीने चंद्रपूर संघ दुसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. मेहुलच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चंद्रपूर येथील आंतरजिल्हा क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बुलढाणा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक येथील संघ सहभागी झाले आहे. गुरुवारपासून युथ क्रिकेट अकॅडमी मैदानावर ८०-८० षटकांचे सामने आयोजित केले आहेत. परंतु, गुरुवारी पावसाने हजेरी लावल्याने शुक्रवारपासून चंद्रपूर व गोंदिया या दोन संघातील सामन्याने झाली. चंद्रपूरच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गोंदिया संघ केवळ १५ षटकात ७६ रन बनवत ऑलआउट झाले. यात एकट्या मेहुलने गोंदिया संघाचे दहाही गडी पटकावले. मेहुलने सात षटकांत २२ रन देत १० विकेट पटकावल्या. यात चार ओव्हर मेडन टाकले. तर चंद्रपूर संघाने नऊ विकेटवर १५७ रन काढून डाव घोषित केला. तर दुसऱ्या डावात गोंदियाने सात विकेटवर १८६ रन काढले. यामध्ये मेहुलने चार विकेट पटकावल्या होत्या. त्याच्या या कामगिरीने चंद्रपूर संघ विजयी झाला. मेहुलच्या कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बॉक्स
मेहुलने बालपणापासून जोपासला क्रिकेटचा छंद
मेहुल हा मायनिंग फायर इंजिनिअरचा विद्यार्थी आहे. वडिलाच्या निधनानंतर आईनेच त्याचा सांभाळ केला. वयाच्या १६ व्या वर्षापासून तो क्रिकेट खेळायला लागला. युथ क्रिकेट अकॅडमी प्रशिक्षक शैलेश भोयर यांच्या नेतृत्वात तसेच व्हॉईट ॲश क्रिकेट ॲकाडमीमध्ये त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. त्याच्या गोलंदाजीपुढे चांगले बल्लेबाजही टिकाव धरू शकत नाही.
मी नियमित क्रिकेटचा सराव करतो. वडिलांच्या निधनानंतर अडचणी येत होत्या. मात्र चंद्रपूर येथील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे यांनी आपणाला मदतीचा हात दिला. तसेच क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला. त्यांच्या सहकार्याने आज इथपर्यंत पोहोचलो आहे. पुन्हा चांगली कामगिरी करत. चंद्रपूर संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा मानस आहे.
-मेहुल शेगमवार, चंद्रपूर