गोंडपिपरी पोलिसांच्या बोटचेपे धोरणामुळे तालुक्यात दारूबंदीचा फज्जा
By admin | Published: July 7, 2015 01:10 AM2015-07-07T01:10:29+5:302015-07-07T01:10:29+5:30
जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी होताच, अवैध विक्री व दारू तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी जिल्हाभरातील पोलिसांनी कंबर कसली.
गस्तीतील कारवायांमध्ये साटेलोटे : अर्थकारणातून होते मद्यपींची सुटका
गोंडपिपरी : जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी होताच, अवैध विक्री व दारू तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी जिल्हाभरातील पोलिसांनी कंबर कसली. मात्र जिल्हा सीमेवर तसेच तेलंगणा राज्यालगत वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात दारूचा महापूर वाहत असून पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाया सामान्यांसाठी कायदेशीर तर असामान्यांना अर्थकारणातून सुटका देणाऱ्या असल्याने तालुक्यात दारूबंदीचा फज्जा उडाला आहे.
जिल्हाभरात दारूविक्रीतून कोट्यवधीचा महसूल शासनाला मिळत असतानाही भाजपाचे सरकार येताच जिल्ह्यात दारूबंदी करून त्याची शिस्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र तालुक्याच्या सीमेला लागून तेलंगणा राज्य असल्याने छुप्या मार्गाने तालुक्यात दारू पोहचविण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. तालुक्यातील भंगाराम तळोधी परिसरात खुलेआम दारू विक्री केली जात असून तेथील चौकी प्रमुख सहाय्यक फौजदार आगबत्तनवार हे दारूविक्रीबाबत कमालिचे मौन बाळगत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस यंत्रणा ‘अर्थ’पूर्ण संबंधातून दारू विक्रेत्यांना अभय देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या सदर परिसरात शिक्षकांकडून विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण, दारू तस्करी, अवैध दारू विक्री, प्रवासी वाहतूक, भांडण-तंटे अशा अनेक गुन्ह्यांचा नोंदीपूर्वीच देवाणघेवाणातून निपटारा करून मलाई लाटण्याचे कार्य चौकी प्रमुखाकडून केल्या जात असल्याचे नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भंगाराम तळोधी परिसरातील नंदवर्धन, शिवणी, पानोरा नदीघाटावर दररोज यात्रेसारखी नागरिकांची गर्दी जमत असून पैलतिरावरून मद्यप्राशन करून येणाऱ्या नागरिकांची झडती घेवून पोलिसांकडून कारवाई करण्याऐवजी देवाण-घेवाणीतून सुटका केल्या जात असल्याचे कळते. गोंडपिपरी पोलिसांच्या अशा हप्तखोर धोरणामुळे पालकमंत्र्यांच्या अपेक्षांना तडा जात असून दारूबंदीचा फज्जा उडाला आहे. (तालुका प्रतिनिधी)