गोंडपिंपरीतील ‘ते’ दोन लाचखोर पोलीस शिपाई निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:52 AM2021-02-06T04:52:22+5:302021-02-06T04:52:22+5:30
गोंडपिंपरी : गोंडपिंपरी येथील ट्रकचालकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन पोलीस शिपायांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. लाचलुचपत ...
गोंडपिंपरी : गोंडपिंपरी येथील ट्रकचालकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन पोलीस शिपायांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. लाचलुचपत विभागाच्या ठाणेदाराला धक्का देऊन लाचखोर पोलीस फरार झाले होते. निलंबनाची कार्यवाही पोलीस विभागाने केली आहे. हे दोन्ही पोलीस दारूच्या नावाखाली सामान्य नागरिकांची लूट करीत होते, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. दरम्यान, या कार्यवाहीने पोलिसांचा कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
गोंडपिंपरी येथील मुख्य मार्गावरील गांधी चौकात दि.२ फेब्रुवारीला गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारताना गोंडपिंपरी येथील राणा नामक होमगार्डला रंगेहाथ पकडले होते. गोंडपिंपरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेेले देवेश कटरे व संतोष काकडे, हे दोन पोलीस लाचखोरीच्या घटनेतील मुख्य सूूत्रधार होते. कार्यवाहीदरम्यान देवेश कटरे याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडले; पण कटरेने एसीबीचे ठाणेदार यशवंत राऊत यांना धक्का देत पळ काढला. तेव्हापासून कटरे व काकडे हे फरार होते. दरम्यान, याप्रकरणी या दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री याप्रकरणी देवेश कटरे व संतोष काकडे या दोन्ही पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती गोंडपिंपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांनी दिली.
संतोष काकडे व देवेश कटरे यांची गोंडपिंपरीतील कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली.