गोंडवाना विद्यापीठ सामाजिक गतिशीलतेचे केंद्र व्हावे
By admin | Published: March 6, 2017 12:30 AM2017-03-06T00:30:37+5:302017-03-06T00:30:37+5:30
गोंडवाना विद्यापीठ हे केवळ शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांचे केंद्र न राहता ते सामाजिक गतिशीलतेचे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी केले.
राजन वेळूकर : व्हिजन कॉन्फरन्सचे उद्घाटन
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ हे केवळ शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांचे केंद्र न राहता ते सामाजिक गतिशीलतेचे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी केले.
चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठाच्या पुढील २५ वर्षांच्या विकासाचा आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने ‘व्हिजन कॉन्फरन्स’चे आयोजन येथे करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. वेळूकर उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर होते.
याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. पी. काणे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, डॉ. नितीन पुजार, डॉ. सुदर्शन कुमार, डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. राजेश चंदनपाट, गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. जीवतोडे व डॉ. जी.एन. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या परिषदेत विद्यापीठाच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा कशी असेल, याबाबत उपस्थितांनी आपली भूमिका मांडली. परिषदेला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे समीर केने, डॉ. राजेश गायधने तसेच संलग्नित महाविद्यालयातील विविध महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाचे संचालक, प्राचार्य, प्राध्यापक, लोकप्रतिनिधी तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिषदेच्या आयोजनामागील भूमिका परिषदेचे समन्वयक डॉ. एन.एस. कोकोडे यांनी मांडली. संचालन गोंडवाना विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. आय.एस. मोहुर्ले यांनी केले.
आभार प्रदर्शन परीक्षा नियंत्रक डॉ. जे.व्ही. दडवे यांनी केले. (प्रतिनिधी)