गोंडवाना विद्यापीठाने बदलविली बीएड चौथ्या सेमिस्टरच्या पेपरची तारीख
By साईनाथ कुचनकार | Published: May 10, 2023 06:49 PM2023-05-10T18:49:00+5:302023-05-10T18:49:32+5:30
Chandrapur News एमपीएसपीच्या परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहू नये तसेच मुंबईला जाणे सोयीचे व्हावे यासाठी विद्यापीठाने परीक्षेची तारीख बदलविली आहे.
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित बी.एड.च्या चौथ्या सेमिस्टरचा १२ मे रोजी पेपर घेण्याचे विद्यापीठाने वेळापत्रक पूर्वीच जाहीर केले होते. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा १३ मे रोजी होत असून, या परीक्षेचे केंद्र मुंबईला आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत बीएडचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. एमपीएसपीच्या परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहू नये तसेच मुंबईला जाणे सोयीचे व्हावे यासाठी विद्यापीठाने परीक्षेची तारीख बदलविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाचा १२ मे रोजी होणारा पेपर आता २४ मे रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, परीक्षेची तारीख बदलविण्यासंदर्भात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी विशेष प्रयत्न केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने उन्हाळी २०२३ च्या परीक्षा सुरू आहेत. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील बी.एड. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचा जेंडर स्कूल अँड सोसायटी या विषयाचा पेपर १२ मे रोजी घेण्याचे विद्यापीठाने यापूर्वीच वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ मे रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा आहे. या परीक्षेचे मुंबई येथे एकमेव केंद्र आहे.
लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले अनेक विद्यार्थी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे बी.एड.चे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना १२ मे रोजी होणारा पेपर देऊन मुंबईला जाणे शक्य नव्हते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन आमदार सुधाकर अडबाले यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पेपरची तारीख बदलविण्यासंदर्भात पत्र पाठविले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करीत १२ मे रोजी होणाऱ्या पेपरच्या तारखेत बदल करत २४ मे रोजी घेण्याचे ठरविले आहे. यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बी.एड.चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.