३० प्राध्यापकांच्या भरती प्रकरणात गोंडवाना विद्यापीठाची चौकशी समिती नावापुरतीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 10:48 IST2025-03-12T10:46:19+5:302025-03-12T10:48:19+5:30
Chandrapur : दोन सिनेट सदस्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

Gondwana University's inquiry committee in the recruitment of 30 professors is in name only
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठातील ३० प्राध्यापकांचे भरती प्रकरण, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावर एक कोटी नऊ लाखांचा खर्च व क्रीडांगण, या तीन प्रकरणांत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी चौकशी समिती स्थापन केली. मात्र, दोन वर्षात समितीची एकही बैठक झाली नाही. ही समिती नावापुरतीच असल्याचा आरोप सिनेट सदस्य डॉ. दिलीप चौधरी, प्रा. नीलेश बेलखेडे यांनी मंगळवारी (दि. ११) पत्रकार परिषदेत केला आहे.
डॉ. चौधरी म्हणाले, गोंडवाना विद्यापीठात ३० प्राध्यापकांची भरती झाली. विद्यार्थी नाही, मात्र प्राध्यापक आहेत, अशी स्थिती विद्यापीठात आहे. प्राध्यापकांच्या भरतीलाही शासनमान्यता नाही.
दौऱ्यावर अनावश्यक खर्च
या संदर्भात चौकशी समिती स्थापन झाली; परंतु एकही बैठक झाली नाही. २०२३ मध्ये दीक्षांत सोहळ्याला राष्ट्रपती प्रमुख अतिथी होत्या. या कार्यक्रमावर एक कोटी नऊ लाख रुपये खर्च झाला. विद्यापीठात एक क्रीडांगण उभारले गेले. त्याच क्रीडांगणावर इमारत बांधली. या प्रकरणीही चौकशी समिती झाली. मात्र, समित्यांची बैठक झाली नाही. कुलगुरूंनी दोन सिनेट सदस्यांसोबत ऑस्ट्रेलियाचा अभ्यास दौरा केला. यासाठी लाखोंचा खर्च झाला, असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.