महात्मा गांधीजींचे ऐकले तरच खादीला चांगले दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 04:45 PM2020-09-29T16:45:46+5:302020-09-29T16:47:15+5:30
खादी ग्रामोद्योग विकासाचे धोरण गांधी विचारांना छेद देऊ नये. कापड उद्योगाच्या स्पर्धेत टिकण्याचे सामर्थ्य खादीत आहे. कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद द्यावे. गांधीप्रणीत खादीचा प्रचार-प्रसार करावा, खादी संस्थांना प्रोत्साहन दिल्यास रोजगाराची साधने वाढतील.
राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महात्मा गांधीजींना भारताच्या ग्रामीण समाजव्यवस्थेचे खरे दुखणे माहित होते. ब्रिटीशांना देशातून चले जाव हा निर्वाणीचा इशारा देण्यापूर्वीच येथील गोरगरीबांच्या जगण्याचे पर्याय काय, हा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यातून खादी चळवळ सुरू झाली. मात्र, ही चळवळ आता संकटात सापडली, याबाबत महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षानिमित्त चंद्रपूर येथील खादी चळवळीचे अभ्यासक व प्रचारक जागेश सोनडुले यांच्याशी साधलेला संवाद...
जिल्ह्यातील खादी ग्रामोद्योगांची वर्तमान स्थिती कशी आहे?
महात्मा गांधीजींनी खादी वस्त्रांना स्वातंत्र्य, स्वावलंन व ग्रामविकासाशी जोडले होते. खादीची ही परिभाषा स्वीकारूनच पाच-सहा संस्था उभ्या झाल्या. सावली, मूल येथील खादी केंद्र उभारण्यास गांधीजींचा प्रत्यक्षात सहभाग होता. गावातील उपलब्ध साधनांचा वापर करून मूल्यवर्धन केल्याने खादीला चांगले दिवस होते. सरकारने देशात राष्ट्रीय खादी व राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे भक्कम पाठबळ मिळाल्याने रोजगाराची व्याप्ती वाढली. स्थानिक संसाधने, उत्पादन, मूल्यवर्धन, विक्री व रोजगार या पंचसूत्रीने हजारो महिलांना बळ दिले. आजचे चित्र निराशाजनक आहे. खादी म्हणजे केवळ अंगावरचे वस्त्र नव्हे तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा उद्योग आहे.
खादी ग्रामोद्योगाला संकटात कुणी ढकलले ?
चुकीच्या धोरणांमुळे हे संकट निर्माण झाले. मानवी श्रमाचे मूल्य नाकारून काही कंपन्यांना अनुकूल धोरण राबविल्याचा हा परिपाक आहे. बदलत्या काळानुसार काही बदल अपेक्षित असले तरी गांधीजींची खादी परिभाषा टाळल्यास ग्रामीण अर्थवस्था व त्यावरील उपजिविका अडचणीत येते. त्याचेच दृष्य परिणाम दिसत आहेत.
तरूणाईला खादीचे आकर्षण का नाही ?
आजच्या तरूण पिढीला खादी वस्त्रांचे आकर्षण का नाही, असे विचारताच जागेश सोनडुले म्हणाले, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एक मोठे उद्योगपती आले होते. त्यांनी खादीचा फुल पॅन्ट घातला होता. तोही हातमागावर तयार केलेला! आकर्षण सर्वांनाच आहे. मात्र, खादी खूप महाग असते, ही मानसिकता अद्याप बदलली नाही. त्यासाठीच उज्वला खादी व ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या माध्यमातून मी परिवर्तनाचे काम करतो. युवक-युवतींना समजावून सांगतो. कार्यशाळा घेतो. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देतो. मात्र, कोरोनामुळे जिल्ह्यातील प्रशिक्षण बंद आहेत.
खादी ग्रामोद्यागाचे भविष्य काय?
खादी ग्रामोद्योग विकासाचे धोरण गांधी विचारांना छेद देऊ नये. कापड उद्योगाच्या स्पर्धेत टिकण्याचे सामर्थ्य खादीत आहे. कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद द्यावे. गांधीप्रणीत खादीचा प्रचार-प्रसार करावा, खादी संस्थांना प्रोत्साहन दिल्यास रोजगाराची साधने वाढतील.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खादी मिशन सूचनेनुसार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी पारंपरिक दागिन्यांबाबत एक प्रस्ताव पाठविण्यात आला. जिवती तालुक्यातील टाटा कोहाळ या मॉडेल गावात तुती लागवड व वन औषध प्रक्रिया उपक्रम सुरू करणार आहे.