गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:24 PM2018-09-24T23:24:51+5:302018-09-24T23:25:07+5:30
ज्या देशाचे आरोग्य उत्तम असेल, त्या देशाच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ज्या देशाचे आरोग्य उत्तम असेल, त्या देशाच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रांची येथे या योजनेचे लोकार्पण केले. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ना. मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी नियोजन भवनात करण्यात आले. कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आमदार नाना श्यामकुळे, आमदार अॅड. संजय धोटे, सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टपूर्तीसाठी आयुष्यमान भारत योजना महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सध्याची उपलब्ध स्थिती म्हणजे ८० टक्के लोकांसाठी २० टक्के तोकडी आरोग्य यंत्रणा आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून खासगी आरोग्य यंत्रणादेखील सामान्य लोकांच्या सेवेत येणार आहे. ही योजना राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील बांधवांसाठी उपयोगाची ठरणार आहे. महाराष्ट्रात या योजनेसोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार आहे. त्यामुळे जवळपास सगळ्या लोकांना आरोग्य विम्याचे कवच मिळणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी ना. हंसराज अहीर यांनी भारताच्या या योजनेची जगभरात चर्चा होईल व यातून ग्रामीण भारताच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा व्यक्त केली.