गोसेखुर्द, आसोलामेंढाचे पाणी सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:35 AM2019-06-16T00:35:10+5:302019-06-16T00:35:47+5:30
मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब लक्षात घेता यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता १ जुलैपासून गोसेखुर्द व असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा निर्णय गोसेखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूरचे अधीक्षक अभियंता यांनी १० जून रोजी घेतला व तसे निर्देश दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब लक्षात घेता यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता १ जुलैपासून गोसेखुर्द व असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा निर्णय गोसेखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूरचे अधीक्षक अभियंता यांनी १० जून रोजी घेतला व तसे निर्देश दिले आहे. यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.
या अनुषंगाने आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग सावलीचे कार्यकारी अभियंता आर.आर.सोनवणे यांनी पत्रकाद्वारे लाभधारकांना व पाणीवापर संस्थांना माहिती दिली आहे. पावसाला विलंब होत असून रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन खरीप हंगामाकरिता आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्र. २ या कार्यालयाने आसोलामेंढा धरणात उपलब्ध पाण्याच्या साठ्यानुसार व शेतकºयांच्या आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
१ जुलै ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी मिळविण्याकरिता संस्थेच्या लाभधारकांनी त्यांची पाण्याची मागणी अर्ज संबंधित पाणीवापर संस्थेकडे सादर करावे, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले आहे.
सूर्याचे आग ओकणे सुरूच
मार्च महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे. दोन-चार दिवसांचा अपवाद सोडला तर जूनच्या १५ तारखेपर्यंत सूर्याचे हे आग ओकणे सुरूच आहे. सातत्याने पारा ४५-४६ अंशापार जात असल्याने जिल्ह्यातील पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत. पाण्याची पातळीही खालावली आहे. जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी दिलासा देणारा मान्सूनपूर्व पाऊसही यंदा आला नाही. त्यामुळे खरीप हंगामच अडचणीत आला आहे. मात्र आता गोसेखुर्द व आसालामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी देण्यात येणार असल्याने काहिसा दिलासा मिळाला आहे.