गोसेखुर्दने फेरले शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 11:14 PM2018-05-09T23:14:00+5:302018-05-09T23:14:13+5:30

Gosekhurd returns to farmers hope | गोसेखुर्दने फेरले शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी

गोसेखुर्दने फेरले शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी

Next
ठळक मुद्दे३० वर्षांत केवळ १९ टक्के सिंचन : कालवा, वितरिकांची कामे अजूनही अर्धवट

घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याची क्षमता असणाऱ्या गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाच्या धरणाचे काम झाले. परंतु, कालवा आणि वितरिकांचे काम अपूर्ण असल्याने भात शेतीचे हेक्टरी सिंचन क्षेत्र अद्याप वाढले नाही. आगामी खरीप हंगामातही सिंचन क्षेत्रात वाढण्याची शक्यता कमीच असल्याने विशेषत: धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.
गोसेखुर्द प्रकल्पाचे २२ एप्रिल १९८३ ला भूिमपूजन झाले. प्रकल्पाचे काम विहित मूदतीत पूर्ण होत नसल्याने प्रकल्पाचा खर्च वाढतच आहे. ३० वर्षांमध्ये मुख्य प्रकल्प तसेच ४२ कि.मी. लांबीच्या डाव्या व ११० कि.मी. लांबीच्या उजव्या कालव्यांचे काम पूर्ण होऊ शकले. दरम्यान प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने शेतकºयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण प्रकल्पाला गती मिळाली नाही. उपकालवे आणि पाणी वितरिकांच्या काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे खरीप हंगात शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास शक्यता कमीच दिसून येते. धरण आणि उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाल्याने तीन वर्षांपूर्वी धरणाचे पाणी आसोला मेंढा तलावात सोडण्यात आले. या तलावाच्या अनेक जुन्या वितरिका आहेत. त्याद्वारे सावली तालुक्याला पाणी मिळत असले तरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील शेतकºयांना ३० वर्षांपासून पाणी मिळत नाही. त्यामुळे शेती करणे कठीण झाले.
प्रकल्पात समावेश असलेल्या नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, चिमूर व अन्य तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. याच पिकांवर तालुक्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. गोसे खुर्द धरणाची निर्मिती झाल्यानंतर उत्पन्नाची शक्यता होती. मात्र, राजकीय उदासिनता व सरकारच्या चालढकल धोरणामुळे शेतकºयांचा अपेक्षाभंग झाला आहे. घोडाझरी उपकालव्याची अवस्था फार बिकट आहे.
१० वर्षांपूर्वी उपकालव्याचे काम सुरू झाले. मात्र बांधकाम कंपन्यांची देयके थकल्याने कामे बंद झाली. तर काही कंपन्यांची कंत्राटे रद्द करण्यात आली. तेव्हापासून उपकालव्याच्या कामाला खिळ बसली आहे. उपकालव्याचे काम बऱ्याच ठिकाणी झाले आहे. पण, खंडित स्वरूपाचे असल्याने गोसेखुर्दच्या महत्त्वपूर्ण उपकालव्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मातीचे डोंगर आणि मृत्यूचा घाट...
गोसेखुर्दच्या उपकालव्यातून मोठ्या प्रमाणावर मातीचा उपसा करण्यात आला आहे. तेथील मातीची इतरत्र विल्हेवाट लावणे गरजेचे होते. पण, कालवा परिसरातील शेतकºयांना मोबदल्याचे आमिष दाखवून माती तिथेच टाकण्यात आली. परिणामी, मातीचे डोंगर तयार झाले आहे. या डोंगरामुळे शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन नापिक झाली. एवढेच नव्हे तर उपकालव्यात काही व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नागभीड तालुक्याचाच विचार केल्यास पाच वर्षांत या कालव्याने सात व्यक्तींचा बळी घेतला आहे. उपकालव्याचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या होत्या. त्यापैकी अनेकांना अद्याप मोबदला मिळाला नाही.
वसाहती पडल्या ओसाड
गोसेखुर्द प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी विदर्भ विकास पाटबंधारे विभागाकडे आहे. प्रकल्प निर्मितीकरिता आवश्यक मनुष्यबळ व त्यांच्यासाठी वसाहत उभारण्यात आली. ब्रम्हपुरी, सायगाटा, नागभीड व सावली येथे उभारण्यात आलेल्या वसाहतींवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. व्यवस्थापन व वेतनावर लाखो रुपये खर्च केले जात आहे. कर्मचाºयांची नियुक्ती झाली आहे. परंतु, प्रकल्पाच्या विविध कामांची जबाबदारी न दिल्याने बहुतेक कर्मचारी कामाविना दिवस ढकलत असून वसाहती ओस पडल्या आहेत.

Web Title: Gosekhurd returns to farmers hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.