गोसेखुर्दचा नहर ठरला मृत्यूचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:21 AM2018-04-06T00:21:11+5:302018-04-06T00:21:11+5:30

गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यासाठी मृत्यूचा घाटच ठरला आहे. बुधवारी या उपकालव्यात बुडून नवेगाव पांडव येथील एका इसमाचा मृत्यू झाला.

Gosekhurd's canal becomes the valley of death | गोसेखुर्दचा नहर ठरला मृत्यूचा घाट

गोसेखुर्दचा नहर ठरला मृत्यूचा घाट

googlenewsNext
ठळक मुद्देनवेगाव पांडव येथील इसमाचा बुडून मृत्यू : आतापर्यंत सात जणांना बळी

घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागाभीड : गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यासाठी मृत्यूचा घाटच ठरला आहे. बुधवारी या उपकालव्यात बुडून नवेगाव पांडव येथील एका इसमाचा मृत्यू झाला. हा आजपर्यंतचा तालुक्यातील सातवा बळी आहे.
गोसेखुर्द धरणाचा मुख्य उजवा कालवा ब्रम्हपुरी तालुक्यातून आसोला मेंढा तलालाकडे गेला आहे. या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून मौशीमार्गे नवेगाव पांडव येथून घोडाझरीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून नागभीड तालुक्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असे अगोदर सांगण्यात येत होते. असे असले तरी नागभीड तालुका तांत्रिक कारणांमुळे पाण्यापासून वंचितच आहे.
या उपकालव्याचे काम सलगपणे पूर्ण झाले नाही. खंड खंड स्वरूपात कालव्याचे काम झाले असल्याने या कालव्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आठ नऊ वर्षापूर्वी या उपकालव्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात शासनाने या कालव्याबाबत हात आखडते घेतल्याने कालव्याचे काम बंद पडले आहे. त्यामुळे हा कालवा लोकांच्या जीवावर उठला आहे.
या कालव्याने केवळ नागभीड तालुक्यातीलच आतापर्यंत ७ लोकांचा बळी आहे. मिळालेल्या माहितीनुसार मौशी येथे आतापर्यंत ३ तर नवेगाव पांडव येथे ४ लोकांचा बळी गेला आहे. मौशी येथील दीपक धनराज देशमुख, दुर्गेश कमलाकर मिसार आणि प्रज्वल विनोद ठाकरे यांचा तर नवेगाव पांडव येथील कमलेश राहाटे, कुमार पांडव, मोरेश्वर विठोबा तिजारे आणि लक्ष्मण मारोती सालोरकर हे चार जण नहराचे बळी ठरले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पाय घसरल्याने गेला जीव
नवेगाव पांडव येथील लक्ष्मण मारोती सालोरकर (५५) हे गोसीखुर्द धरणाच्या घोडाझरी उपकालवा परिसरात फिरायला गेले होते. ते परत येत असताना पाय घसरल्याने कालव्यात पडले. यात त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ते निष्फळ ठरले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसही लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि पोहणाऱ्यांच्या मदतीने लक्ष्मणचा शोध घेण्यात आला. मात्र त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने मृतदेहच सापडला.

Web Title: Gosekhurd's canal becomes the valley of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.