गोसेखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात लवकरच सोडणार - मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2015 01:06 AM2015-09-19T01:06:39+5:302015-09-19T01:06:39+5:30
गोसेखुर्द धरणाचे पाणी लवकरच घोडाझरी तलावात सोडण्यात येईल, अशी ग्वाही शुक्रवारी राज्याचे वित्त तथा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागभीड येथे दिली.
कार्यकर्त्यांशी संवाद : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण
चंद्रपूर : गोसेखुर्द धरणाचे पाणी लवकरच घोडाझरी तलावात सोडण्यात येईल, अशी ग्वाही शुक्रवारी राज्याचे वित्त तथा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागभीड येथे दिली.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी नागभीड तालुक्याचा दौरा करून तेथील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी नागभीड येथील भाजपा कार्यालयाला भेट दिली. यावेळी खा. अशोक नेते, माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल देशकर, आ. कीर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय गजपुरे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे, होमदेव मेश्राम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध उपलब्धी, लोककल्याणकारी निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
या भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गोसीखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात लवकरच सोडण्यात येईल व या भागातील शेतक-यांना दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते नागभीड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालयाचे लोकार्पणदेखील झाले. पाण्याचे महत्व ओळखून वन क्षेत्रातील वाहते पाणी तलावात कसे सोडता येईल, यावर विचार करावा तसेच वनक्षेत्रात बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)