गोसीखुर्दचे पाणी कोकलपार तलावात सोडण्यात यावे
By admin | Published: June 8, 2016 12:44 AM2016-06-08T00:44:47+5:302016-06-08T00:44:47+5:30
गोसेखुर्द धरणाचे पाणी तालुक्यातील कोकलपार तलावात सोडण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी केली असून ...
अविनाश पाल: सुधीर मुनगंटीवार यांना दिले निवेदन
सावली: गोसेखुर्द धरणाचे पाणी तालुक्यातील कोकलपार तलावात सोडण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे.
सावली तालुक्यातील निमगाव या गावांतर्गत येणाऱ्या धानारी शेतीचे क्षेत्रफळ अंदाजे ३५०.०० हेक्टर आर आहे आणि शेतीला पाणी पुरवठ्यासाठी कोकलपार येथील मालगुजारी तलाव आहे. परंतु या तलावाखाली येणाऱ्या शेतीच्या क्षेत्रफळानुसार या तलावचे पाणी अपुरे पडत आहे. या तलावांतर्गत येणाऱ्या शेतातील पिके पाण्याअभावी दरवर्षी सुकून जातात. या तलावाखाली येणारा शेतकरी हा अल्पभूधारक असून याच शेतीच्या भरोशावर त्यांची उपजिविका अवलंबून आहे. मागील १० वर्षांपासून या तलावाखालील शेती पाण्याअभावी सुकत असल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाण्याअभावी दरवर्षी शेती मरत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या तलावापासून गोसीखुर्द धरणाचा कालवा अंदाजे २ किलोमिटर अंतरावर असून सदर कालव्याला जोडून एक कालवा या तलावात दिल्यास येथील तलावात पाणी येण्यास कसलीही अडचण भासणार नाही. या धरणाच्या पाण्यामुळे येथील शेतकरी आपल्या शेतात पीक घेवून आपली उपजिविका भागवू शकतील.
राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून निमगाव पाणलोटअंतर्गत येणाऱ्या कोकलपार तलावात गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्यास तेथील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येवून शेतकरी सुजलाम् सुफलाम् बनतील व शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी मिळेल.
गोसीखुर्द तलावाचे पाणी कोकालपार तलावात सोडण्याची मागणी भाजपाचे सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल, भाजयुमो सावली तालुका महामंत्री पुनम झाडे, उपसरपंच गुरुदास ढोले, सदस्य रामदास झाडे, शालू लाटकर सरिता झाडे, संतोष थोराक, अनिल राजगडे, लोमेश गेडाम, अभय लाटकर, डॉ. ठाकूर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)