खूप झाले, आता संविधान घ्या !

By admin | Published: January 30, 2016 01:15 AM2016-01-30T01:15:00+5:302016-01-30T01:18:50+5:30

कोणताही कार्यक्रम म्हटला की, पाहुण्यांच्या स्वागताला पुष्पहार पुष्प गुच्छ व गुलाब फुल आलेच.

Got a lot, now take the Constitution! | खूप झाले, आता संविधान घ्या !

खूप झाले, आता संविधान घ्या !

Next

शिक्षकांचा अनोखा उपक्रम : पाहुण्यांच्या स्वागतात दिली प्रत
बल्लारपूर: कोणताही कार्यक्रम म्हटला की, पाहुण्यांच्या स्वागताला पुष्पहार पुष्प गुच्छ व गुलाब फुल आलेच. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची पद्धत आहे. याला अपवाद कोणतेही क्षेत्र नाही. हीच प्रथा आजतागायत सुरू आहे. तसा प्रघातच पडला आहे. मात्र याला मोडीत काढत बल्लारपूर तालुक्यातील एका शिक्षक संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी ‘खूप झाले, आता संविधान घ्या’ म्हणत पाहुण्यांचे स्वागत संविधानाची प्रत देऊन केले. शिक्षकांच्या अनोख्या उपक्रमाने प्रमुख पाहुणेही चक्रावले.
औचित्य होते. बल्लारपूर तालुक्यातील तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजनाचे बल्लारपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने येनबोडी येथील कर्मवीर विद्यालयाच्या क्रीडांगणावर १९ ते २२ जानेवारी दरम्यान शालेयस्तरावर क्रीडा महोत्सव पार पडला. उद्घाटन समारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करुन करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान, कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत परंपरागत प्रथेला बाजुला सारुन भारतीय संविधानाची प्रत प्रदान करुन करण्यात आले. विशेष म्हणजे बल्लारपूर तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून संविधानाचे पुस्तक देण्यात आले. सदर उपक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेली येथील शिक्षिका कविता गेडाम यांच्या संकल्पनेतून तालुका कास्ट्राईब संघटनेच्यावतीने राबविण्यात आला. या तालुक्यातील शिक्षक संघटनेच्या उपक्रमाचे मान्यवरांनी भरभरुन कौतुक केले.
भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्याचे सर्वश्रूत आहे. मात्र देशाच्या कारभार चालविण्यासाठी घटनात्मक कायद्याची आवश्यकता तत्कालीन राज्यकर्त्यांना वाटली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीत इतरही विद्वान सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्यांच्या अनुषंगाने भारताचे संविधान लिहिले. संविधानात सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र, समानता, एकात्मता, बंधुत्व जोपासणारे संविधान दिले.
भारतीय नागरिकांना अभिप्रेत असलेल्या मुल्यांचा त्यात समावेश् करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तब्बल २ वर्ष ११ महिने व १७ दिवसांचा कालावधी लागला. तद्नंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तत्काीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद व पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना सादर केले होते. खऱ्या अर्थाने भारत देश २६ जानेवारी १९५० पासून घटनात्मक अधिकाराने सार्वभौम लोकशाहीचे राष्ट्र म्हणून ओळखले जात आहे. या घटनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जात आहे.
त्यांच्या या महान कामगिरीचा गौरव म्हणून १२५ व्या जयंती उत्सवाला सोनेरी किनार लाभावी म्हणून शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी तब्बल २०० रुपये किंमतीच्या संविधानाच्या पुस्तकांची भेट १२५ जणांना प्रदान करुन अनोखा पायंडा पाडला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात असा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून ‘खूप झाले, आता संविधान घ्या!’ नाविण्यपूर्ण व प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Got a lot, now take the Constitution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.