विकास व लोकाभिमुख कामासाठी शासन कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:34 AM2018-06-29T00:34:54+5:302018-06-29T00:35:25+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या इमारती पूर्ण व्हाव्यात, त्याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल. परंतु, त्या इमारती निर्जीव राहू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्र व राज्य सरकार विकासाच्या व लोकाभिमुख कामाकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या इमारती पूर्ण व्हाव्यात, त्याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल. परंतु, त्या इमारती निर्जीव राहू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्र व राज्य सरकार विकासाच्या व लोकाभिमुख कामाकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते वरोरा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, माजी मंत्री संजय देवतळे, जि. प. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, पं. स. सभातपी रोहिनी देवतळे, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, उपसभापती विजय आत्राम, उपविभागीय अधिकारी संजय बोदेले, नगरसेवक बाबा भागडे, आदी उपस्थित होते. वरोरा, भद्रावती तालुक्यातील विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत. हे क्षेत्र विकसित होणे गरजेचे आहे. त्याकरिता पक्षाच्या भिंतीपलीकडे जावून एकत्र येणे आवश्यक आहे. विकासाकरिता मोठा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत, वरोरा पंचायत समितीची नवीन इमारत सुसज्ज करण्याकरिता एक कोटी रूपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती रोहिनी देवतळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापतींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता नरेंद्र बुरांडे यांनी तर संचालन प्रमोद तुराणकर यांनी केले.
पावसामुळे सरपंचांची अडचण
पंचायत समिती वरोरा येथील प्रशासकीय इमारतीने उद्घाटनाला बराच विलंब लागला. पाऊस पडत असल्याने निमंत्रित सरपंचांना बसण्याकरिता जागेची अडचण निर्माण झाली. त्यामुळे सरपंच संतप्त झाले होते. त्यांनी नियोजनाबाबत जि. प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपले गाऱ्हाने मांडले.
पालिकेच्या कामांचे उदघाटन झालेच नाही
वरोरा न. प.च्या वतीने दोन कामांचे उद्घाटन नियोजित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. याकरिता फलक लावून सुसज्ज तयारी करण्यात आली. परंतु, उद्घाटन करण्यात आले नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने उद्घाटनाचे फलक रात्रीच काढून घेतले.