मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:24 PM2019-01-29T23:24:39+5:302019-01-29T23:24:53+5:30

मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. जुलै २०१८ च्या नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी घोषित करण्यात आलेल्या विशेष पॅकेजमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंबंधीची घोषणा केली होती.

Government Agricultural College at the parent | मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय

मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : अर्थमंत्र्यांच्या घोषणेची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. जुलै २०१८ च्या नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी घोषित करण्यात आलेल्या विशेष पॅकेजमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंबंधीची घोषणा केली होती.
जिल्ह्यातील नागरिकांच्या उपजिविकेचे साधन प्रामुख्याने जंगल व शेतीवर आधारित आहे. सदर जिल्हयातील नागरिकांची कृषी शिक्षण घेण्याची मानसिकता असूनसुध्दा सदर जिल्हा मागास असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये युवक व युवतींसाठी कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. ज्यामुळे आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ग्राम पातळीवर विस्तार कार्यकर्ते, ग्रामसेवक, कृषीमित्र व तज्ज्ञ मार्गदर्शक निर्माण होवू शकतील. या क्षेत्राची ही विशिष्ट गरज लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठामार्फत शासनाला सादर करण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.
मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन झाल्यास जिल्हयातील युवक युवतींसाठी कृषी पदवीधर अभ्यासक्रमाची सुविधा निर्माण होणार असून त्या माध्यमातून बदलत्या हवामानानुसार कृषी व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय व शेती उद्योग ज्यामुळे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार या भागात होवू शकतो. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती कशी करावी. यासंबंधीचे प्रशिक्षण व सल्ला देवून पिकांची उत्पादकता वाढून पयार्याने त्यांचा आर्थिकस्तर उंचावेल. ही गरज लक्षात घेता हे महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांतर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यांचा समावेश होतो. सद्य:स्थितीत पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी केवळ दोनच घटक कृषी महाविद्यालये कार्यरत असून पूर्व विदर्भातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सदर शासकीय कृषी महाविद्यालय सहाय्यभूत ठरणार आहे.

कृषी विकासाचा मिळणार गती
चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी शिक्षण व प्रशिक्षण या प्रक्रियेच्या माध्यमातून जिल्हयाचा कृषी विषयक विकासाला या कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेने गती मिळणार आहे. या आधीही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात ९६ हजार शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ, चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्थापना, टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ९२ गावांमध्ये समृध्द शेतकरी प्रकल्प, जे.के. ट्रस्ट्रच्या सहकार्याने जिल्ह्यात १५ ठिकाणी भाकड गायींचे दूध उत्पादक गायींमध्ये रूपांतरण करण्याचा प्रकल्प, पोंभुर्णा येथे मधुमक्षिका पालनाचा कृषी उद्योग, चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातुन जिल्ह्यात मोठया प्रमाणावर बंधाºयांची निर्मिती, चिचडोह बॅरेजच्या माध्यमातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ४३ गावांना सिंचनाचा लाभ, जिल्हयातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीसाठी मोठया प्रमाणावर निधीला मंजुरी, विशेष बाब या सदराखाली मूल आणि पोंभुर्णा या तालुक्यातील शेतकºयांसाठी सिंचन विहीरींना मंजुरी, पळसगांव-आमडी उपसा सिंचन योजना हा महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मूल तालुक्यातील चिचाळा व लगतच्या गावांमध्ये पाईपलाईनद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध करण्याचा २३ कोटी रू. किमतीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आदींचा समावेश आहे.

सोमनाथ येथील जागेचा विचार
मूल लगतच्या मारोडा, सोमनाथ येथे विद्यापीठाच्या मालकीची ६१.८० हेक्टर जमीन उपलब्ध आहे. यापैकी ४१.८० हेक्टर जमीन या कृषी महाविद्यालयासाठी उपलब्ध होवू शकते. या कृषी महाविद्यालयाकरिता शेती प्रयोगासाठी आवश्यक ३० हेक्टर जमिनीची निकड उपलब्ध जमिनीतून भागविली जावू शकते. झुडपी जंगल कृषी शाखेच्या विद्यार्ध्यांना पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीकोणातून अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकते. या सर्व बाबी लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत मुल येथे ६० विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमतेचे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Web Title: Government Agricultural College at the parent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.