सरकारी रुग्णालय नावालाच; औषधी बाहेरुनच विकत आणा ! आरोग्य क्षेत्रातील बिकट स्थितीमुळे रुग्णांत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:37 PM2024-08-26T13:37:25+5:302024-08-26T13:38:37+5:30
Chandrapur : रुग्णालयासमोर असलेल्या जनरिक मेडिकलमध्येसुद्धा औषध मिळत नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर रुग्णांना चांगल्या दर्जाची रुग्णसेवा मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र येथील औषधभांडारात औषधांचा साठा अपुरा राहत असल्यामुळे बऱ्याचदा रुग्णांना बाहेरील औषधालयातून औषधी खरेदी करावी लागत आहे. विशेष म्हणजे रुग्णालयासमोरच असलेल्या जनरिक मेडिकलमध्येसुद्धा औषधे मिळत नसल्याची ओरड रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील स्थिती दयनीय आहे. याठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना सुविधा मिळत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण घरोघरी दिसून येत आहेत. शासकीय रुग्णालयात उपचार झाला तरीही औषध मिळत नसल्याचे दिसून येते.
अॅण्टीबायोटिक, स्कीन संदर्भातील औषधे, डोळ्यात टाकण्यात येणारे ट्यूब बऱ्याचदा बाहेरुन खरेदी करुन आणावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नातेवाईक वैतागले
"माझी प्रकृती बरी नव्हती म्हणून दाखवायला आलो होतो. त्यातील काही औषधे मिळाली. काही औषधे बाहेरुन खरेदी करण्यास सांगण्यात आली आहेत. जेनरिक मेडिकलमध्येसुद्धा औषधे मिळाली नाहीत."
-रुग्ण
"माझ्या जांघेत खाजेची समस्या असल्याने रुग्णालयात दाखविण्यासाठी आलो होतो. डॉक्टरांनी गोळ्या व ट्यूब लिहून दिला. गोळ्ळ्या मिळाल्या मात्र ट्यूब मिळाला नाही."
-रुग्ण