वृक्ष लागवडीसाठी शासकीय कार्यालयाची उदासिनता
By Admin | Published: May 23, 2016 12:55 AM2016-05-23T00:55:49+5:302016-05-23T00:55:49+5:30
विविध योजनांच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयांतर्गत प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात लाखो वृक्षांची लागवड करण्यात येते.
पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्याची गरज : लाखो झाडे लावल्याची नोंद कागदावरच
ब्रह्मपुरी : विविध योजनांच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयांतर्गत प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात लाखो वृक्षांची लागवड करण्यात येते. त्यापोटी कोट्यवधी रुपये खर्च होतात. परंतु झाडे लावल्याची नोंद कागदावरच होत असल्याने जुन्या खड्डयात नवे झाड लावण्यात शासकीय कार्यालयातील अधिकारी मात्र चांगलेच वाक्बगार झाले असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळा सुरू होण्याला १० ते १५ दिवसांचा कालावधी असताना वृक्ष लागवडीच्या नियोजनासाठी अद्यापही शासकीय कार्यालयांना मुहूर्त सापडला नाही. शासनाच्यावतीने विविध कार्यालयामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. परंतु लावलेल्या वृक्षांचे संगोपन होत नसल्यामुळे वृक्ष वाढण्याच्या ऐवजी नष्ट होत आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीवर होणारा कोट्यवधींचा खर्च पाण्यात जात आहे. त्यामुळे राज्य शासनाने वृक्ष लागवडीऐवजी वृक्ष संगोपनावर व संरक्षणाला अधिक महत्त्व देवून त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. मात्र तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
शासनाने मागील वर्षीपासून शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयांना सहभागी करून वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर पालिका, वनविभाग, सामाजिक वनिकरण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, लघु सिंचन विभाग, कृषी विभाग व इतर सामाजिक संस्था आदी शासकीय कार्यालयांचा वृक्ष लागवड कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. परंतु यावर्षी या कार्यालयांकडून अद्याप वृक्ष लागवडीसाठी हालचाल दिसून येत नसल्याने उदासिनता स्पष्ट झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)