शासकीय अधिकारी, कर्मचारी लागले कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:25 AM2021-02-07T04:25:45+5:302021-02-07T04:25:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदाफाटा : जिल्ह्यात ९ फेब्रुवारीपासून तीन दिवस पंचायत राज कमिटी येत असल्याने ग्रामपंचायतींसह पंचायत समिती, जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदाफाटा : जिल्ह्यात ९ फेब्रुवारीपासून तीन दिवस पंचायत राज कमिटी येत असल्याने ग्रामपंचायतींसह पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी कागदांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
मागील दोन-तीन वर्षांचा लेखाजोखा ग्रामपंचायतीसह इतर कार्यालयांना या कमिटीसमोर सादर करावयाचा असून, यात ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापकांसह पंचायत राज अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांतील कर्मचारी कागदपत्रे नीटनेटकी ठेवताना दिसत आहेत. कोरपना तालुक्यातही शासकीय कार्यालयातील कर्मचारीही पंचायत राज कमिटी येत असल्याने कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयासह गोदामाचीही स्वच्छता ठेवण्यात येत आहे. गोदामातील भंगार वस्तू तसेच साठवलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावताना कर्मचारी दिसत आहेत. युद्धपातळीवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले असून, पंचायत राज कमिटीकरिता व्यवस्थापन सुरू असून, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या कमिटीची चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आता तालुक्यात पाहायला मिळत आहे. आपल्या कार्यालयातील तक्रार वरिष्ठ पातळीवर जाऊ नये तसेच लेखाजोखा देता यावा, याकरिता मुद्देसूद माहिती गोळा करताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होतानाही दिसत आहे. कधीही वेळेवर कार्यालयात हजर न राहणारे कर्मचारी आता मात्र सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात हजर राहून काम करत असल्याचे दिसते.