पोलीस मैदानावर शासकीय कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:13 AM2018-01-26T00:13:20+5:302018-01-26T00:13:48+5:30
प्रजासत्ताक दिनाचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता पोलीस मैदानावर होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रजासत्ताक दिनाचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता पोलीस मैदानावर होत आहे. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाणार आहे. यासोबत चंद्रपूर महानगरपालिकेत शुक्रवारी सकाळी ७.५० वाजता ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. जिल्हा परिषदेत सकाळी ८ वाजता प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराळ भोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
यासोबत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.
ग्रामसभेत कुष्ठरोग निर्मूलनावर भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या प्रगती योजनेत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा सहभाग केला आहे. त्यामुळे यावर्षी २६ जानेवारीला गावागावात होणाºया ग्रामसभेत सरपंचांनी आपल्या भाषणामध्ये कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाविषयी जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय कुष्ठरोग मुक्तभारत यासाठी सर्वसामान्यांना प्रतिज्ञा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा सहसंचालक कार्यालयाने या संदर्भात एक अध्यादेश काढून राज्यस्तरीय स्पर्श अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार राज्य समन्वय समिती, राज्य कुष्ठरोग समिती, जिल्हा समन्वय समिती, तालुका समन्वय समिती यांचे गठन करण्यात आले आले आहे.