शासनाचा महसूल घटला
By admin | Published: January 22, 2017 12:53 AM2017-01-22T00:53:53+5:302017-01-22T00:53:53+5:30
जिल्ह्यात कोषागार कार्यालयाकडे असलेली सर्व जमा रक्कम, मुद्रांक विक्री आणि नोंदणी फीच्या माध्यमातून शासनाला महसूल प्राप्त होत असतो.
मुद्रांक शुल्क व नोंदणी फी : डिसेंबर महिन्यातील उत्पन्न ४ कोटींनी कमी
चंद्रपूर : जिल्ह्यात कोषागार कार्यालयाकडे असलेली सर्व जमा रक्कम, मुद्रांक विक्री आणि नोंदणी फीच्या माध्यमातून शासनाला महसूल प्राप्त होत असतो. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत डिसेंबर महिन्यातील उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी ७ कोटी ७४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी त्यामध्ये ६० टक्क्यापर्यंत कपात होऊन केवळ ३ कोटी ७६ लाख रुपये झाले आहे.
जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे व्यवहारासह अनेक प्रकारच्या शासकीय फीची रक्कम मुद्रांक शुल्क विभागाकडे जमा होत असते. ती रक्कम शासनाच्या तिजोरी जमा करण्यात येत असते. त्याचा अहवाल शासनाकडे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात येत असतो. राज्यातील सर्व मुद्रांक शुल्क कार्यालयाकडून मिळणाऱ्या उत्पन्नावरून राज्य शासनाच्या महसुलात भर पडत असते. राज्य उत्पादन शुल्क विभाग, विक्री कर आदींप्रमाणेच मुद्रांक शुल्क विभाग हादेखील शासनाच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे.
केवळ डिसेंबर महिन्यातच उत्पन्न कमी झाले असून नसून नोव्हेंबर महिन्यातदेखील मुद्रांक शुल्काचे उत्पन्न कमी झाल्याचे आढळून आले. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम जिल्ह्यातील जमीन व मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर झाला आहे. त्यातून मंदीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे मुद्रांकातून मिळणाऱ्या उत्पन्नातही घट झाली आहे.
एप्रिल ते डिसेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत २०१५मध्ये ५४ कोटी ८९ लाख २४ हजार ३८९ रुपये उत्पन्न झाले होते. तर याच कालावधीत २०१६मध्ये ४७ कोटी ५८ लाख ४८ हजार ८२२ रुपयांचे उत्पन्न झाले. त्यामध्ये २०१५च्या नोव्हेंबर महिन्यात एकूण ११ कोटी ८२ लाख ८६ हजार ६६२ रुपयांचे उत्पन्न झाले होते. याच २०१६च्या नोव्हेंबर महिन्यात सर्व प्रकारचे उत्पन्न मिळून ८ कोटी ६७ लाख ८७ हजार १०६ रुपये जमा झाले. डिसेंबर-२०१५मध्ये ७ कोटी ७४ लाख ४ हजार ९४४ रुपये जमा झाले होते. तर डिसेंबर-२०१६मध्ये ३ कोटी ७५ लाख ८४ हजार ८०१ रुपये जमा झाले आहेत. (प्रतिनिधी)
शासनाचे उत्पन्नाचे मार्ग
कोषागाराकडे जमा असलेली रक्कम, कोषागारातून विक्री करण्यात आलेले न्यायिक आणि न्यायिकेत्तर मुद्रांक, दुय्यम निबंधक व सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात फ्रँकिंगद्वारे जमा होणारी रक्कम, ई-चलनाद्वारे जमा होणारी रक्कम, अभिनिर्णयाद्वारे जमा होणारी रक्कम, नोंदणी विवाह फी, नोंदणी फी इतर माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा समावेश शासनाच्या महसुलात होत असते.
दस्त नोंदणीतही घट
मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत असतानाच दस्त नोंदणीदेखील यावर्षी डिसेंबर महिन्यात कमी झाली. डिसेंबर-२०१५ मध्ये २ हजार २९७ दस्त नोंदणी करण्यात आली होती. यावर्षी डिसेंबर-२०१६मध्ये १ हजार १०८ दस्त नोंदणी करण्यात आली.