शासनाने ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राला संरक्षित क्षेत्र घोषित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:32+5:302021-08-17T04:33:32+5:30
दत्तात्रय दलाल ब्रह्मपुरी : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागांपेक्षा विदर्भात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्यातही चंद्रपूर जिल्हा ...
दत्तात्रय दलाल
ब्रह्मपुरी : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागांपेक्षा विदर्भात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्यातही चंद्रपूर जिल्हा व ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात ही संख्या अधिक आहे. शासनाने ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राला संरक्षित क्षेत्र घोषित करणे अत्यावश्यक ठरते. जेथे संघर्ष निर्माण होतो अशा क्षेत्रात परिसीमा आखून संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केल्यास त्या परिसराची पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख निर्माण होईल. येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. शिवाय जंगलाचे व वन्यप्राण्यांचे संरक्षण होणार आहे.
शासनाने ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राला संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मागणी ोऐरणीवर आहे. ताडोबासारखा विकास व पर्यटन वाढविल्यास विदर्भाच्या मानात नवा तुरा रोवला जाणार आहे. उत्तर-दक्षिण असा ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र पसरला आहे. संपूर्ण विस्तार लक्षात घेतल्यास ३१ हजार हेक्टर वनविभागाचे क्षेत्र आहे. ब्रह्मपुरी क्षेत्रातील जैवविविधता वन्य प्राण्यांसाठी पोषक आहे. संपूर्ण वनपरिक्षेत्रात विविध वन्य पशू, पक्षी मोठ्या संख्येने आहेत. मानव-वन्यजीव संघर्ष हे नित्याचेच आहे. अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे, तर अनेक नागरिक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. शिवाय शेकडो पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे.
कोट
संरक्षित क्षेत्र घोषित करताना छोट्याछोट्या गावांचे पुनर्वसन करणे हे अडचणीचे ठरणार आहे. शासनाने गावांच्या पुनर्वसनाची योग्य सोय लावून याबाबतीत निर्णय घ्यावा. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या, सोलर संरक्षक भिंत तयार करावी. तसेच नागरिकांनी अनावश्यक जंगलात जाणे टाळावे.
- विवेक करंबेळकर,
मानद वन्यजीव संरक्षक, ब्रह्मपुरी, (चंद्रपूर)
बॉक्स
ताडोबा बफर क्षेत्र ब्रह्मपुरी वनविभागाला लागून
ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात विविध प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यात वाघ, बिबट, हरीण, रानगवा, मोर आदी पशू, पक्षी आहेत. ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र सिंदेवाही वनपरिक्षेत्राला तर सिंदेवाही वनपरिक्षेत्र ताडोबा बफर क्षेत्राला लागून आहे. ब्रह्मपुरीपासून अवघ्या ७०-८० किमी अंतरावर ताडोबा बफर क्षेत्र आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर या तिन्ही क्षेत्रांत असावा. जंगलालगतच्या गावांचे पुनर्वसन करून संरक्षित क्षेत्र घोषित करावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
160821\img_20210816_142806.jpg
हत्तीलेंडा - अड्याळ जंगलातून जाणारा मार्ग