शासनाने शिक्षकांना शाळाबाह्य कामाची सक्ती करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:15 PM2018-05-19T23:15:02+5:302018-05-19T23:15:02+5:30
आरटीई कायद्यानुसार शिक्षकांना स्थानिक प्राधिकरण राज्य विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या कर्तव्याखेरीज इतर कोणतीही शिक्षकेत्तर कामे देण्यात येऊ नये, असे नमूद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आरटीई कायद्यानुसार शिक्षकांना स्थानिक प्राधिकरण राज्य विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या कर्तव्याखेरीज इतर कोणतीही शिक्षकेत्तर कामे देण्यात येऊ नये, असे नमूद आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक खासगी संस्थेतील शिक्षकांना बीएलओ काम करण्यासंबंधीचे पत्र शाळांना मिळाले. यामुळे शैक्षणिक कामावर परिणाम होणार आहे. शासनाने शिक्षकांना शाळाबाह्य कामे देण्याची सक्ती करू नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केली आहे.
आरटीई अॅक्टनुसार शाळाबाह्य कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये, असा स्पष्ट उल्लेख आहे. निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार बीएलओ काम फक्त कॉन्ट्रॅक्ट टीचर्स यांना देण्यात यावे, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र शाळाबाह्य कामासाठी खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. एक वर्षापूर्वी शाळाबाह्य कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये, याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिले होते. त्यावेळी बीएलओचे काम शिक्षकांना देण्यात येणार नाही, असे तोंडी अभिवचन शिष्टमंडळास दिले होते. मात्र शासनाने ते पाळले नाही. शिक्षकांना शाळाबाह्य कामाच्या मानसिक दबावातून मुक्त करावे, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, लक्ष्मण धोबे, दिगंबर कुरेकर, मनोज वसाडे यांच्यासह बीएलओचे काम देण्यात आलेले शिक्षक उपस्थित होते.