पोंभूर्णा येथील एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी शासन लक्ष देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:31 AM2021-08-19T04:31:29+5:302021-08-19T04:31:29+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या पोंभूर्णा तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी त्वरित संबंधितांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना देण्यात येईल, ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या पोंभूर्णा तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी त्वरित संबंधितांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना देण्यात येईल, या औद्योगिक वसाहतीत जास्तीतजास्त उद्योग येतील, याकडे शासन विशेष लक्ष देईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दिले.
पोंभूर्णा येथील एमआयडीसी लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत पोंभूर्णा हा आदिवासीबहुल नक्षल प्रभावित तालुका आहे. या तालुक्यात नवे उद्योग यावे व परिसरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळाव्या, यादृष्टीने एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोंभूर्णा औद्योगिक क्षेत्र स्थापन करून त्वरित कार्यान्वित करण्यासाठी सद्य:स्थितीत भूसंपादन तसेच शेत-यांना संपादित जमिनीचा मोबदला देण्याकरिता येत असलेल्या अडचणीचे निराकरण करणे आवश्यक आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
या प्रकरणी तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करून संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात येईल, एमआयडीसी लवकर कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.