२९ पासून शासकीय कामे बंद पडणार
By admin | Published: February 24, 2016 12:48 AM2016-02-24T00:48:57+5:302016-02-24T00:48:57+5:30
चंद्रपूर व वर्धा जिल्हा प्रशासनाने २७ जानेवारीला पत्रक काढून शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून खनिज शुल्क तपासणी करून...
कंत्राटदारांचा इशारा : खनिज शुल्क तपासणीचा निषेध
चंद्रपूर : चंद्रपूर व वर्धा जिल्हा प्रशासनाने २७ जानेवारीला पत्रक काढून शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून खनिज शुल्क तपासणी करून ५ पट दंड वसुल करण्याचे बांधकाम खात्याला आदेश दिले आहे. या निर्णयाच्या चंद्रपूर सर्कल बिल्डरर्स असोशिएशनने निषेध केला असून २९ फेब्रुवारीपासून सर्व शासकीय कामे करण्याचा निर्णय असोशिएशनने घेतला आहे.
खनिज शुल्क तपासणीचा आदेश काढून चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शासकीय कामे होऊ नयेत व सगळी रक्कम परत जायला हवी असे धोरण दिसून येत असल्याचे असोशिएशनने म्हटले आहे. एकीकडे परवान्याकरिता परवानगी द्यायची नाही, वेळेवर रेती घाटांचे लिलाव करायचे नाही, खनिकर्म कार्यालयात खनिज विषयी क्लिअरन्स द्यायचे नाही आणि बांधकाम खात्यास वेठीस धरून अवाजवी वसुली करण्याचे फर्मान प्रशासनाने या पत्रकाद्वारे काढला आहे. या पत्रकाचा चंद्रपूर जिल्हा कंत्राटदार संघटना, वर्धा जिल्हा कंत्राटदार संघटना तसेच बेरोजगार इंजिनिअर संघटना, मजूर सहकारी संस्था यांनी निषेध करून शासकीय कामे २९ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कंत्राटदार संघटनेचे उपाध्यक्ष अजय जयस्वाल यांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)