गोविंदाच्या गजरात निघणार रातघोडा
By admin | Published: February 9, 2017 12:40 AM2017-02-09T00:40:05+5:302017-02-09T00:40:05+5:30
पावणे चारशे वर्षांचा इतिहास असलेली चिमूर येथील घोडारथ यात्रा जिल्ह्यात नाही तर विदर्भात प्रसिद्ध आहे.
घोडा रथयात्रा उत्सवाला सुरुवात : लाखो भाविक होणार सहभागी, सोमनाथ मंदिर ठरतेय आकर्षण
राजकुमार चुनारकर चिमूर
पावणे चारशे वर्षांचा इतिहास असलेली चिमूर येथील घोडारथ यात्रा जिल्ह्यात नाही तर विदर्भात प्रसिद्ध आहे. मितीमाघ शुद्ध (वसंत पंचमी) १ फेब्रुवारीला सुरु झालेल्या घोडारथ यात्रेचा रातघोडा प्रसिद्ध आहे. या रात घोड्यासाठी पंचक्राशीतील लाखो भाविक बालाजी महाराजांचे दर्शन घेवून मोठ्या उत्सवाने सहभागी होतात. बुधवारी रात्री १० वाजता ‘गोविंदा... गोविंदा’च्या गजरात शहराच्या मुख्य मार्गाने रात घोड्याची मिरवणूक निघणार आहे.
१ फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात झाली आहे. महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या या घोडायात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. दररोज रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत विनोदुबवा खोड महाराज उमरेड यांचे कीर्तन होत आहे. चिमूरचा घोडा, ब्रह्मपुरीचा जोडा आणि चंद्रपूर वढा या पुरातन म्हणीनुसार ३९० वर्षापासून सुरु असलेल्या चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज घोडारथयात्रा वसंत पंचमीला सुरु झाली.
घोडारथ यात्रेमधील भाविकाच्या मनोरंजनासाठी आकाशपाळणे, सर्कस, खेळण्याची दुकाने इतर साहित्याचे दुकान थाटले आहेत. गाव खेड्यातून येणाऱ्या भाविकांना निरनिराळे मनोरंजनाचे केंद्र थाटले आहेत. मितीमाघ शुद्ध जयोदशी गुरुवारी रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत अशा लाकडी घोडारथावरुन श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिमेची घोडारथ यात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत मंदिरासमोर स्थापना होते. या रात्र घोड्यासाठी विदर्भातील व पंचक्रोशीतील जवळपास एक ते दीड लाख भाविक रथयात्रेत हजेरी लावून भक्तीमय वातावरणात गोविंदा ... गोविंदा च्या गजरात भक्त तल्लीन होतात. शनिवारी ११ फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत गोपालकाला होवून नवरात्री समाप्ती होणार आहे. ३९० वर्षापासून सरु असलेली घोडारथ यात्रा मोठ्या भक्तीभावाने आजच्या डिजिटल युगातही सुरू आहे.
सोमनाथ मंदिर ठरतेय भाविकाचे आकर्षण
भाविकांना देशातील इतर मंदिराची माहिती व्हावी म्हणून आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्या वतीने नऊ वर्षापासून मंदिराच्या पुढे प्रतिकृती तयार करण्यात येते. सध्या येथे तयार झालेले गुजरात येथील सोमनाथ मंदिर भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडारथ यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या शांतता सुव्यवस्थेसाठी चिमूर पोलीस विभागातर्फे १२ अधिकारी, शंभर कर्मचारी,एसआरपी पथक यासह सिव्हील वेशातील गोपनीय कर्मचारची नियुक्ती केली आहे. रातघोडा व काल्याचा दिवसापासून शहरातील मुख्य मार्गाने जड वाहनाना प्रवेश दिल्या जाणार नाही.
- दिनेश लबडे, ठाणेदार, चिमूर
घोडा रथयात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी नियोजित यात्रा मैदानावरील जागेचे सपाटीकरण, यात्रेकरुसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्यपथकाची व्यवस्था, अग्निशामन व्यवस्था, विद्युत व्यवस्था व शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिस पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे.
- शिल्पा राचलवार, नगराध्यक्ष