गोवरीत आरोग्य विभागाची चमू दाखल
By admin | Published: July 26, 2016 01:02 AM2016-07-26T01:02:33+5:302016-07-26T01:02:33+5:30
राजुरा तालुक्यातील गोवरी येथे चार- पाच दिवसांपासून वायरल फिरवने थैमान घातल्याचे वृत्त रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच ...
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी येथे चार- पाच दिवसांपासून वायरल फिरवने थैमान घातल्याचे वृत्त रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच आरोग्य विभाग खळबळून जागे झाले. कढोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील चमूने गोवरी गावाला भेट देऊन नागरिकांची रक्त तपासणी करून वैद्यकीय उपचार केला.
गोवरी येथे आरोग्य उपकेंद्र आहे. परंतु, या उपकेंद्रात सोईसुविधांचा अभाव असल्याने हे केंद्र आता अखेरच्या घटका मोजत आहे. गोवरी आरोग्य उपकेंद्रांतर्गत गोवरी, साखरी, हिरापूर, चिंचोली, पोवनी, गोवरी कॉलनी या गावाचा समावेश आहे. परंतु, या आरोग्य उपकेंद्राचा भार शेरकी नामक आरोग्यसेविकेवर आहे. इतर गावात सेवा देताना नाईलाजास्तव त्यांना आरोग्य उपकेंद्र बंद ठेवावे लागते. त्यामुळे गोरगरीब गरजू रुग्णांना उपकेंद्राच्या गेटवरुनच परत जावे लागते.
येथील मलेरिया वर्कर मोरे यांची गेल्या १५ दिवसांपूर्वी बदली झाली. परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सहा गावांचा डोलारा एका आरोग्यसेविकेला सांभाळावा लागत असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागते. गोवरी येथे वायरल फिरवने ५० हुन अधिक रुग्ण खाटेवर तापाने फणफणत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच कढोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्रेहलता बडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य चमू गोवरी येथे दाखल झाली.
यामध्ये आरोग्य सहाय्यक एस.ए. भटारकर, पी.आर. वाघमारे, आरोग्य कर्मचारी पी.पी. पराते, बी.जी. गोटमुखले, ए. आर. ढुमणे, गोवरी उपकेंद्रातील आरोग्यसेविका बी. शेरकी, एस.एच. ढोके, आशावर्कर आशा झाडे, बाविसकर यांचा सहभाग होता.
तपासणी दरम्यान चमूला रुग्णांमध्ये डोकेदुखी, ताप, सांधेदुखी अशी लक्षणे दिसून आली. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वांनी स्वच्छता पाळावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनानेही गावात स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)