पुरस्कार परत घेण्याचे पोरखेळ थांबवा - संमेलनाध्यक्ष डॉ. वि. स. जोग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 06:22 PM2022-12-19T18:22:29+5:302022-12-19T18:25:28+5:30
६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे सूप वाजले
चंद्रपूर (शांताराम पोटदुखे साहित्य परिसर ) : कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर फ्रीडम पुस्तकाला पुरस्कार घोषित करून परत घेण्याचे सरकारचे कृत्य सर्वत: निषेधार्ह आहे. हे कृत्य सरकारला शोभेसे नाही, पुरस्कार जाहीर करून परत घेण्याचा अक्षरश: पोरखेळ विद्यमान सरकारने चालविला आहे. हा पोरखेळ बंद करून सरकारनेच आता हा पुरस्कार लेखकांच्या घरी जाऊन ससन्मान प्रदान करावा, अशी मागणी ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वि. स. जोग यांनी केली.
गोंडवाना विद्यापीठ, सर्वाेदय शिक्षण मंडळ, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित ६८ व्या साहित्य संमेलनाचे सूप वाजले. समारोपप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार, स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्रशांत पोटदुखे, डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, विलास मानेकर, केंद्रीय प्रतिनिधी श्याम मोहरकर, कार्याध्यक्ष प्रमोद काटकर, सहकार्यवाह संजय वैद्य, सूर्यांशचे इरफान शेख, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे उपस्थित होते.
समारोपीय अध्यक्षीय भाषणात संमेलनाध्यक्ष डॉ. जोग यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांनी समारोपीय भाषणात ‘साहित्य संमेलनात राजकारणावर टीका केल्याशिवाय संमेलन गोड होत नाही. या संमेलन आयोजनात ज्या चुका झाल्या त्या आता होऊन गेल्या, भविष्यात चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे’, असे सांगितले. स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत बोकारे यांचेही भाषण झाले. यावेळी पल्याड चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश दुपारे यांचा तसेच आयोजन समिती व सूर्यांशच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन गीता देव्हारे-रायपुरे, आभार इरफान शेख यांनी मानले.
संमेलनात पाच ठराव पारित
महापुरुषांसंबंधी अवमानकारक व्यक्तव्ये जाहीरपणे करण्यास आल्याची घटना घडली आहे. लोकभावनेचा आणि जनमानसाचा विचार करता या प्रकारच्या घटना यापुढे घडू नये, असा ठराव पारित करण्यात आला. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील पाणीप्रश्न ही कळीचा प्रश्न झाला आहे. शासनाने अमृत योजना जाहीर करून सुद्धा त्याची पूर्तता झाली नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने या योजनेची पुनर्निरीक्षण करून ती पूर्णतः कार्यान्वित करावी, जाहीर झालेल्या पुरस्कार परत घेणे हा साहित्यिक कलावंतांचा अपमान आहे. शासनाच्या या कृतीवर असमाधान व्यक्त करीत अशा प्रकारची कृती पुढे होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी असा ठराव शासनाकडे पाठवण्यासंबंधी ठराव केला. वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस आधकातिकारक म्हणून शासनाने जाहीर करावा जिल्हा व तालुका स्तरावरील संस्थाना संमेलन घेण्यासाठी डीपीडीसीतून मदत करावी असा ठराव घेतला गेला.