जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया डगमगला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 09:23 PM2022-11-20T21:23:13+5:302022-11-20T21:23:43+5:30
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत आहे, याचा अभ्यास करण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत चाचणी घेण्यात घेण्यात आली. यामध्ये तीनही विषयांचे पाच स्तर तयार करण्यात आले. या स्तरानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले.
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : निपुण भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची काही दिवसापूर्वी अध्ययन स्तर चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये धक्कादायक सत्य समोर आले आहे. चाचणीमध्ये पहिल्या वर्गातील सोडाच पाचवीच्याही अनेक विद्यार्थ्यांना साधे वाचताही येत नसल्याचे सत्य समाेर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ही चाचणी शिक्षण विभागाने घेतली असून, त्याचा निकालही जाहीर केला आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत आहे, याचा अभ्यास करण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत चाचणी घेण्यात घेण्यात आली. यामध्ये तीनही विषयांचे पाच स्तर तयार करण्यात आले. या स्तरानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. मात्र, यामध्ये ठरवून दिलेल्या मूल्यमापनापेक्षाही कितीतरी कमी पटीने विद्यार्थी गुणवत्तेत मागे असल्याचे निकालातून दिसून येत आहे. पहिली आणि दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना विचार केला नाही तरी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांना किमान शब्द ओळख, वाचन, लिखान येणे गरजेचे आहे.
मातृभाषेमध्येही विद्यार्थी मागे
घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये मातृभाषा असलेल्या मराठीमध्येही विद्यार्थी मागे असल्याचे दिसून येते. यामध्ये ११.८ टक्के विद्यार्थ्यांना साध्या अक्षरांची ओळख नाही, तर २२.८ टक्के विद्यार्थ्यांना गोष्ट वाचता येते.२१.९ टक्के विद्यार्थी केवळ शब्दच वाचन करू शकतात तर २२.२ टक्के विद्यार्थ्यांना अक्षराची ओळख आहे.
शिक्षकांमध्ये नाराजी
गुणवत्ता वाढीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, अनेकवेळा ते चुकीच्या पद्धतीने कार्यक्रम आखले जात असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. ही चाचणीही घेताना पहिला आणि दुसरा वर्ग वगळून घेणे अपेक्षित होते. जुलै महिन्यामध्ये शाळा सुरू झाली असताना सप्टेंबरमध्येच चाचणी घेण्याची घाई प्रशासनाने केली. त्यामुळे गुणवत्ता ढासळल्याचे काही गुरुजींचे म्हणणे आहे
इंग्रजीची भीती मात्र कायमच
पहिली ते पाचवीपर्यंत घेण्यात आलेल्या अध्ययन स्तर चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती असल्याचे दिसून येते. चाचणी घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७५.५६ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दाचा अर्थ, तर ९३.६४ टक्के विद्यार्थ्यांना वाक्याचा अर्थ सांगता येत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. केवळ ६.४ टक्केच विद्यार्थ्यांना वाक्याचे वाचन करता येते. १३.७ टक्के विद्यार्थी प्रारंभिक स्तरावरच असल्याचे दिसून येते.
भाषा विषयात १५ शाळांची प्रगती समाधानकारक
- जिल्ह्यातील एकूण शाळांमध्ये घेतलेल्या चाचणीमध्ये केवळ १५ शाळांची प्रगती काहीशी समानधाकारक आहे. यामध्ये मराठी भाषेतील गोष्ट वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, या १५ शाळांमधील पटसंख्या ही अगदीच कमी आहे. या शाळामध्ये भद्रावतीतील बेलोरा, अगारा, किलोनी, कढोली, गुंजाळा, मोरवा, ब्रह्मपुरी तालुक्यातील गवराळा, पवनपार, कुडेसावली, जिवती तालुक्यातील चिखली बु., मूल तालुक्यातील ताडाळा, चांदापूर (हेटी), पोंभूर्णा तालुक्यातील डोंगळहळदी तु., सातारा भोसले, राजुरा तालुक्यातील हिरापूर या शाळांचा समावेश आहे.