‘ग्रेसफूल’ स्वागत आणि निरोप
By admin | Published: May 3, 2017 12:43 AM2017-05-03T00:43:07+5:302017-05-03T00:43:07+5:30
या जिल्ह्याच्या पहिल्या महिला पोलीसप्रमुख नियती ठाकर मंगळवारी शहरात दाखल झाल्या.
नियती ठाकर दाखल : संदीप दिवान यांची पुणे लाचलुचपत विभागात बदली
चंद्रपूर : या जिल्ह्याच्या पहिल्या महिला पोलीसप्रमुख नियती ठाकर मंगळवारी शहरात दाखल झाल्या. या निमित्ताने पोलीस मुख्यालयात त्यांचे नागरिकांनी हृदयापासून स्वागत केले. तसेच मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांनाही नागरिकांनी उल्हासित वातावरणात निरोप दिला. दिवान यांची बदली पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात झाली आहे.
नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वीच त्यांच्या परभणी येथील कतृत्वाच्या आख्यायिक निर्माण झाल्या आहेत. त्यांची कार्यशैली, कम्युनिटी पोलिंगच्याद्वारे त्यांनी मिळविलेली लोकप्रियता चंद्रपुरात ‘ग्रेसफूल’ ठरली आहे. त्या सामान्य नागरिकांएवढ्याच आपल्या सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांना परभणी पोलीस विभागाने दिलेल्या सहृदयी निरोप समारंभाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनाची उत्सूकता चंद्रपूरकरांना लागून असल्याची प्रचिती मंगळवारी चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयात आली. या निरोप आणि स्वागत समारंभाप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान व त्याच्या धर्मपत्नी मधुरा दिवान यांचा सत्कार करण्यात आला. हा निरोप व स्वागत जिल्हाधिकारी आशुतोष सलील, स्थानिक गुन्हे शाखेतर्फे पोलीस निरीक्षक अंभोरे, शांतता समितीचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे, प्रवीण खोब्रागडे, रजमान अली, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, टीपू सुलतान फाऊंडेशनचे पदाधिकारी, अनेक सामाजिक कार्यकर्ते आदींनी केले. यावेळी दिवान यांनी चंद्रपुरात केलेल्या कर्तृत्वाचा आढावा सादर करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात दखलपात्र गुन्ह्यांमध्ये घट झाल्याची आकडेवारी सादर करण्यात आली. २०१४ मध्ये ३८३६ गुन्हे २०१५ मध्ये २४५ ने कमी होऊन ३५९१ वर आले आणि २०१६ मध्ये ४२० गुन्हे कमी होऊन ३१७१ गुन्हे दाखल झाले. अदखलपात्र गुन्ह्यात २०१४मध्ये १८ हजार ८५३ गुन्हे, २०१५मध्ये १८ हजार १२६ आजण २०१६मध्ये १५ हजार ९६८ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली. अपघातात २०१४मध्ये ९९३, २०१५मध्ये ७५८ व २०१६मध्ये ६२८ अपघातांची नोंद करण्यात आली, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी दिली. (प्रतिनिधी)
नवीन एसपींवर अपेक्षांचे ओझे
नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी परभणी जिल्ह्यात केलेल्या कर्तुत्वाच्या ‘आख्यायिका’ चर्चेत आहेत. या आख्यायिकेंच्या माध्यमातून त्यांच्याकडून चंद्रपूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या अपेक्षांचे ओझे घेऊन ठाकर यांना चंद्रपूरमधील ‘इनिंग’ सुरु करावी लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदी लागू करून अनेक महिलांचे आशिर्वाद घेतले आहेत. त्याच वेळी दारूबंदीमुळे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या जाळ्यात ओढले जात आहेत. दारू तस्करीसह अंमली पदार्थांच्या तस्करीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मायेचा हात फिरविणारे दिवान
यावेळी मनोगत व्यक्त करताना चंद्रपूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर अंजली घोटेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दिवान यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरविणारे आणि निधड्या छातीचे पोलीस अधिकारी आहेत, अशा शब्दात महापौर घोटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.