चंद्रपुरात सकल मराठा क्रांती मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 10:51 PM2018-08-04T22:51:32+5:302018-08-04T22:53:02+5:30
जय जिजाऊ, जय शिवबा...एक मराठा, लाख मराठा...असा जयघोष करीत शासनाचा निषेध नोंदवत चंद्रपुरातून मराठा बहुउद्देशीय सेवा मंडळाच्यावतीने शनिवारी दुपारी १२ वाजता सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचताच जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळामार्फत सादर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जय जिजाऊ, जय शिवबा...एक मराठा, लाख मराठा...असा जयघोष करीत शासनाचा निषेध नोंदवत चंद्रपुरातून मराठा बहुउद्देशीय सेवा मंडळाच्यावतीने शनिवारी दुपारी १२ वाजता सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचताच जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळामार्फत सादर करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण येथील गांधी चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करीत असताना मोर्चकरी जय जिजाऊ जय शिवबा, एक मराठा लाख मराठा असा जय घोष करीत होते. तसेच विविध मागण्यांच्या घोषणा देत होते. मोर्चकऱ्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. त्यावर सरकारचा निषेध असे नमुद होते. मोर्चाच्या अनुषंगाने शहर, रामनगर व वाहतुक नियंत्रण शाखेने चोख बंदोबस्त ठेवला होता.
मोर्चाच्या मार्गाला जुळणारे मार्ग मोर्चा पुढे जाईपर्यंत बंद करण्यात आले होते. मोर्चामध्ये लहानमुला-मुलींसह मोठ्या संख्येने महिला व पुरुषवर्ग सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच प्रमुख मागण्यांचे निवेदन मंडळाचे अध्यक्ष सतीश कदम, कार्याध्यक्ष लिलाधर महाडीक, सचिव हरीहर भांडवलकर, संघटन सचिव प्रभाताई शितोळे, मंगला माने यांच्या शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले.
या मोर्चामध्ये जिवती, बल्लारपूर, चिमूर, घुग्घूस, मूल, सावली, भद्रावती व वरोरा येथील मोठ्या संख्येने मराठा समाजबंधुभगिनी आबालवृद्ध व विद्यार्थी वर्ग सहभागी होत्या.
या मोर्चाच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष सतिश कदम, कार्याध्यक्ष लिलाधर महाडीक, सचिव हरीहर भांडवलकर, उपाध्यक्ष सुनिल निंबाळकर, अजय चव्हाण, संघटन सचिव सुरेश धारकर, रमेश काकडे, आकाश भालेराव, सुरेश घोडके, प्रतापराव माने, सचिन लगड, प्रविण वैद्य, प्रभाताई शितोळे, मंगला माने, प्रवीण वैद्य, महेश झिटे, इंद्रजीत देशमुख, शेषराव जगताप यांचे सहकार्य लाभले.
प्रमुख मागण्या
या मोर्च्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, कोपर्डीच्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे, आंदोलनातील समाज बांधवावरील गुन्हे मागे घ्यावे व जे मृत्यूमुखी झाले त्यांच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी तसेच घरातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, या मागण्यांकडे लक्ष वेधले गेले.