घोडपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राला मॉडेल पीएचसीचा दर्जा द्या
By admin | Published: January 15, 2015 10:49 PM2015-01-15T22:49:08+5:302015-01-15T22:49:08+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मॉडेल पीएचसी बनण्यास योग्य आहे. सर्व मानकांची पूर्तता केली जात असतानाही केवळ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या आरोग्य केंद्रास मॉडेल पीएचसी
घोडपेठ: येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मॉडेल पीएचसी बनण्यास योग्य आहे. सर्व मानकांची पूर्तता केली जात असतानाही केवळ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या आरोग्य केंद्रास मॉडेल पीएचसी बनण्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप या क्षेत्राचे जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी केला आहे.
घोडपेठ हे अंदाजे पाच हजार लोकसंख्येचे गाव असून चंद्रपूर- नागपूर महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. या गावात प्राथमिक ते माध्यमिक शाळा, ग्रामपंचायत, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, सहकारी सोसायटी, एटीएम सुविधा, व्यापारपेठ आठवडी बाजार तसेच अन्य सोई-सुविधा आहेत.
घोडपेठपासून अवघ्या तीन किमीच्या परिघात अंदाजे अकरा गावांचा समावेश असून या सर्वच गावातील रुग्णांना उपचारासाठी घोडपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागते. त्यामुळे या आरोग्य केंद्रास मॉडेल पीएचसीचा दर्जा मिळाल्यास या परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळू शकेल.
सदर आरोग्य केंद्रास मॉडेल पीएचसी म्हणून कार्यान्वित करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली होती व या केंद्रास मॉडेल पीएचसी म्हणून कार्यान्वित करण्याकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही दिले होते. मात्र अधिकार यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला असून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास हे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे.
उपरोक्त मागणीबाबत जि.प. सदस्य वानखेडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांची २ जानेवारी रोजी भेट घेऊन चर्चा केली असता आरोग्य विभागात निधीची कमतरता असल्याचे कारण सांगून या विषयाला बगल देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून होत आहे. शासन आरोग्य सुविधांसाठी प्राधान्यक्रम देऊन निधी उपलब्ध करीत असताना अधिकारी मात्र याबाबतीत उदासीनता बाळगून आहेत. या अधिकाऱ्यांनी ग्रामीण आरोग्य व्यवस्था प्रभावी करण्यासाठी घोडपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रास मॉडेल पीएचसी बनविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अन्यथा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा विजय वानखेडे यांनी दिला आहे. (वार्ताहर)