ग्रामपंचायत इमारती दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:52 PM2018-01-12T23:52:12+5:302018-01-12T23:52:51+5:30
नागभीड परिसरातील आठ ग्रामपंचायतींचा नागभीड नगर परिषदेत समावेश करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
नागभीड : नागभीड परिसरातील आठ ग्रामपंचायतींचा नागभीड नगर परिषदेत समावेश करण्यात आला. ज्या ग्रामपंचायतींचा पालिकेत समावेश करण्यात आला, त्या ग्रामपंचायतींच्या इमारती आता दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे नगर परिषदेने वेळीच याबाबत नियोजन करण्याची गरज आहे.
११ एप्रिल २०१५ रोजी नागभीड नगर परिषदेची स्थापना करण्यात आली. नगर परिषदेची स्थापना करतेवेळी नागभीड नगर परिषदेच्या निकषात बसत नसल्याने नागभीडच्या नजिक असलेल्या काही गावांचा या नगर परिषदेत समावेश करण्यात आला. यात नवखळा, बाम्हणी, डोंगरगाव, बोथली, चिखलपरसोडी, भिकेश्वर, तुकुम आणि सुलेझरी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
नगर परिषद स्थापन होण्यापूर्वी या ग्रामपंचायत इमारतींमधून गावांचा कारभार चालायचा. याच ठिकाणी ग्रामसभांचे आयोजनही व्हायचे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही या ठिकाणी झडायच्या. ग्रामीण राजकारणाचे अस्सल प्रतिबिंब या ठिकाणी दिसायचे. अनेकांच्या विजयाचे उत्सव तसेच कित्येकांच्या पराभवाचे तोंडही या इमारतींनी पाहिले आहे. गेल्या पाऊणे दोन वर्षांपासून या इमारती एखाद्या पाषाणासारख्या उभ्या आहेत. या इमारतीत कोणतीही चहलपहल नाही. काही इमारती तर सतत उघड्या असतात. यामुळे या इमारतीत कोणतीही अनुचित घडू नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने या इमारतींचा चांगल्या कामासाठी उपयोग करण्यासाठी विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.
नगरसेवकांचे कार्यालय ?
बाम्हणी, डोंगरगाव येथील व अन्य ठिकाणच्या या इमारती लाखो रुपये किमंतीच्या आहेत. गेल्या काही वर्षांपुर्वी या इमारतींचे बांधकाम करण्यात आले. कायद्यात बसत असेल तर या इमारतींचा उपयोग नगरसेवकांच्या कार्यालयाकरिता करण्यासाठी करावा. जेणेकरून या इमारतींची देखभाल होईल.
या इमारतींमध्ये झोन कार्यालय सुरू करण्याची कल्पना आहे. जेणेकरून नागरिकांना छोट्या कामासाठी नागभीडला यावे लागणार नाही. यासाठी आपण अध्यक्ष व अन्य नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय घेऊ.
- गणेश तर्वेकर
उपाध्यक्ष न.प.नागभीड
या इमारतींनी गावाचा कारभार पाहिला आहे. लोकांच्या भावना या इमारतींशी जुळल्या आहेत. नगर परिषद प्रशासनाने या इमारतींना अशा बेवारस सोडू नये. या इमारतींचा विधायक कामासाठी वापर करावा.
- अमृत शेंडे
माजी सरपंच, बाम्हणी