विलगीकरणातील कोरोना रुग्णांना ग्रामपंचायतीनेच पुरविला खर्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 12:16 PM2021-12-03T12:16:23+5:302021-12-03T12:40:36+5:30
विलगीकरणातील कोरोना रुग्णांनाचा थेट खर्रा पुरविला. खर्रा पुरवून ग्रामपंचायत थांबली नाही तर खर्र्याचे बिल थेट पंचायत राज या ॲपवर टाकले. ४०० रुपये एकूण खर्र्याचे देयक आहे.
नीलेश झाडे
चंद्रपूर : कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणात ठेवल्यानंतर त्यांना चहा, नाष्टा, जेवण, साबण, निरमा, आदी वस्तूंचा पुरवठ्याचा खर्च सबंधित ग्रामपंचायतीला उचलायचा होता. मात्र, जिल्ह्यातील सोमणपल्ली या ग्रामपंचायतीने विलगीकरणात असलेल्यांची फारच काळजी घेतली. इतर वस्तूंप्रमाणेच विलगीकरणातील कोरोना रुग्णांनाचा थेट खर्रा पुरविला.
खर्रा पुरवून ग्रामपंचायत थांबली नाही तर खर्र्याचे बिल थेट पंचायत राज या ॲपवर टाकले. ४०० रुपये एकूण खर्र्याचे देयक आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर एकीकडे ग्रामपंचायतीवर टीकेची झोड उडाली असतानाच गावातील माणसांचे शौक पूर्ण केले, त्यात वाईट काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
राज्यात तशी सुगंधित तंबाखूवर बंदी आहे. मात्र गावागावांत सुगंधित तंबाखू वापरलेला खर्रा मिळतोच. कोरोनाकाळात खर्राचे भाव गगनाला भिडले होते. ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, अशा व्यक्तींनी दारू व खर्रा या व्यसनांपासून चार हात लांब रहावे, असा सल्ला डॉक्टर द्यायचे. मात्र ग्रामपंचायतीनेच चक्क खर्रा पुरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ग्रामपंचायतीचा यू टर्न
सोमणपल्ली ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली म्हशाखेत्री यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते खर्रा नसून खारा आहे. ग्रामीण भागातील हॉटेलात चिवड्याला खारा म्हटले जाते. मात्र, खारा आणि नास्ता हे वेगवेगळे नाहीत. नास्ताचे देयकही जोडण्यात आले आहेत. उपसरपंच कवडू कुबडे यांना विचारणा केली असता त्यांनीही खाराचे बिल असल्याचे सांगितले. विलगीकरणातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना ग्रामपंचायत मजुरांकरवी नाष्टा बनवून द्यायची. मग हॉटेलातील खारा कशाला आणला? या प्रश्नावर मात्र उपसरपंचांनी मौन बाळगले. विशेष म्हणजे कोरोनाकाळात हॉटेल्स बंद होती.