ग्रामपंचायतीने चक्क पाण्याची टाकीच विकली !
By admin | Published: May 7, 2017 12:31 AM2017-05-07T00:31:46+5:302017-05-07T00:31:46+5:30
येथील ग्रामपंचायतीने एका व्यक्तीला मालमत्तेचे गावठाण प्रमाणपत्र तसेच कर आकारणी यादी (असेसमेंट लिस्ट) दिली.
घोडपेठमधील प्रकार : मोका चौकशी न केल्याने संशय बळावला
वतन लोणे। लोकमत न्यूज नेटवर्क
घोडपेठ : येथील ग्रामपंचायतीने एका व्यक्तीला मालमत्तेचे गावठाण प्रमाणपत्र तसेच कर आकारणी यादी (असेसमेंट लिस्ट) दिली. या कागदपत्रांवरून त्या व्यक्तीने त्याची मालमत्ता दुसऱ्याला विकली. मात्र प्रमाणपत्र देताना ग्रामपंचायतीने साधी मोकाचौकशी न केल्याने यात ग्रामपंचायतीच्या जागेवरील व ग्रामपंचायतीच्या मालकीची पाण्याची टाकीही विकली गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घोडपेठ येथील नंदा देवराव मद्रासी यांचे मालमत्ता / घर क्रमांक ४६१ हे जुना गावठाणमध्ये आहे. असे प्रमाणपत्र तसेच या मालमत्तेची कर आकारणी यादी (असेसमेंट लिस्ट) ग्रामपंचायत घोडपेठकडून विद्यमान सरपंच व तत्कालीन सचिव यांच्या सही व शिक्क्यानिशी मागील वर्षी देण्यात आले.
याच कागदपत्रांच्या आधारे नंदा देवराव मद्रासी यांच्याकडून संबंधित मालमत्तेची विक्री करण्यात आली. गावातीलच एका व्यक्तीने ही मालमत्ता मागील वर्षी खरेदी केली. मात्र, हे प्रमाणपत्र देताना ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिव यांच्याकडून जागेची मोकाचौकशी करण्यासंबंधात हलगर्जीपणा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयापासून ही जागा अगदी हाकेच्या अंतरावर आहे. सन १९८५-८६ च्या दरम्यान जि.प. चंद्रपूरच्या सिंचन विभागाने बांधकाम केलेली व सध्या ग्रामपंचायतीच्या मालकीची असलेली तीन हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी याच मालमत्तेच्या आवारात आजही उभी आहे. मालमत्तेची कायदेशीर विक्री झाल्याने ही पाण्याची टाकीही विकल्या गेली आहे.
त्यानंतर जागेच्या नवीन मालकाने आपल्या नावाने करण्यासाठी घोडपेठ ग्रामपंचायतीला रितसर अर्ज केला होता. त्यावेळेसही ग्रामपंचायतीकडून मोकाचौकशी करून व चतुर्सिमा तपासून बघितले असते तर ही पाण्याची टाकी ग्रामपंचायतीच्या हद्दीतच राहिली असती. मात्र या ही वेळेस अक्षम्य असा हलगर्जीपणा करण्यात आला. या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषी आढळल्यास सचिवांची नियमानुसार दोन पगारवाढ कपात करावी, तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करून त्यांचे पद गोठविण्यात यावे, अशी मागणी घोडपेठ येथील दिलीप शंकर साव यांनी केली आहे.
या जागेबद्दल ६४८ चौ. फूट एवढ्या जागेचे ग्रामपंचायतीने अधिकृत प्रमाणपत्र दिले आहे. याच जागेवर जुनी पाण्याची टाकी आजही उभी आहे. मात्र जुन्या रेकॉर्डनुसार ग्रामपंचायतीची जागा सोडल्यास तेव्हाच्या भोगवटदाराची गावठाणाची जागा फारच कमी होती. वास्तविक गावठाणाची जागा विक्री करता येत नाही. या ठिकाणी जुन्या रेकॉर्डसोबत छेडछाड करून ही सरकारी जागा पाण्याच्या टाकीसह विकण्यात आली आहे.
- दिलीप शंकर साव, सामाजिक कार्यकर्ता, घोडपेठ.
ती जागा ग्रामपंचायतीची नसावी. तसेच ही पाण्याची टाकी तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यासाठी जागा मालकाने परवानगी दिली असेल. ग्रामपंचायत रेकॉर्डवर टाकीची नोंद असती, तर ते प्रमाणपत्र दिले नसते.
- विलास भिवगडे, तत्कालीन ग्रामविस्तार अधिकारी घोडपेठ (सध्या रिटायर्ड)
अभिलेख आणि नमुना ८ अ या संबंधीचे रेकॉर्ड हे ग्रामविस्तार अधिकारी यांच्याकडे असते. त्यांनी फेरफार संबंधाने नमुना ८ अ व इतर कागदपत्रे दिली असतील. ते योग्य असेल असे मला वाटते.
- वैशाली उरकुडे, सरपंच ग्रा.पं. घोडपेठ.